टॉसवर ठरणार पं.स.सभापती
By Admin | Updated: March 11, 2017 23:49 IST2017-03-11T23:47:41+5:302017-03-11T23:49:05+5:30
धारूर : पंचायत समितीमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन-तीन सदस्य निवडून आल्याने पुन्हा टॉस करण्याची पाळी येणार

टॉसवर ठरणार पं.स.सभापती
धारूर : पंचायत समितीमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन-तीन सदस्य निवडून आल्याने पुन्हा टॉस करण्याची पाळी येणार असून, राष्ट्रवादीकडून दोन तर भाजप कडून एक सभापती पदासाठी दावेदार आहेत. या वेळी भाग्य कोणाला साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धारूर येथील पंचायत समितीत पुन्हा पाच वर्षापूर्वी प्रमाणेच दोन्ही प्रमूख पक्षांचे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी तीन सदस्य निवडून आले आहेत. पुन्हा सभापती व उपसभापती दोन्ही पदाच्या निवडी टॉसवर करण्याची पाळी येणार आहे. येथील सभापती पद यावेळी सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन नावे चर्चेत आहेत. मोहखेड गणातून निवडून आलेल्या आशालता सोंळके व धुनकवड गणातून निवडून आलेल्या चंद्रकलाबाई नागरगोजे ही दोन नावे चर्चेत आहेत, तर भाजपकडून विद्यमान सभापती अर्जूनराव तिडके यांच्या पत्नी भोगलवाडी गणातून निवडून आलेल्या कमलबाई तिडके यांचे नाव चर्चेत आहे.
आता भाग्य १४ मार्चला कोणाला साथ देणार हे काळच ठरवणार आहे, तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बालासाहेब मोरे तर भाजपा कडून शिवाजी काचगुंडे व प्रकाशराव कोकाटे यांची नावे चर्चेत आहेत.
टॉसवर सभापती व उपसभापतीच्या निवडी असल्याने यावेळी भाग्य कोणाला साथ देणार हे काळच ठरवणार आहे. नागरिकात मात्र याबद्दल उत्सुकता आहे. (वार्ताहर)