‘लॉन’च्या कामात पोरखेळ
By Admin | Updated: February 10, 2015 00:31 IST2015-02-09T23:52:46+5:302015-02-10T00:31:25+5:30
सोमनाथ खताळ , बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या सुशोभिकरणासाठी सुमारे ६० लाखांचा निधी आला. यातील निम्मा निधी हा केवळ ‘लॉन’च्या कामासाठी आहे,

‘लॉन’च्या कामात पोरखेळ
सोमनाथ खताळ , बीड
येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या सुशोभिकरणासाठी सुमारे ६० लाखांचा निधी आला. यातील निम्मा निधी हा केवळ ‘लॉन’च्या कामासाठी आहे, मात्र हे काम संथगतीने तर सुरूच आहे, शिवाय कामांचे योग्य नियोजनही नसल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
जिल्हा क्रीडा संकूल असूनही याठिकाणी खेळाडंूना अपेक्षेप्रमाणे सोयी-सूविधा मिळत नाहीत. त्यांच्या राहण्यापासून ते खेळाच्या मैदानापर्यंत कसलीच सुविधा खेळाडूंना नव्हती. मात्र काही संघटनांनी हे क्रीडा संकूल सुसज्ज व्हावे, अशी मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीने या संकुलाचा प्रस्ताव दाखल केला. याला मंजुरीही मिळाली. त्याप्रमाणे या कामासाठी ६० लाख रुपयांचा निधी क्रीडा कार्यालयाला मिळाला.
यामध्ये ३० लाखांचे काम हे केवळ लॉनचे असून स्प्रींकलरद्वारे पाणी देण्यासाठी १४ लाखांचा निधी आहे. मात्र सध्या हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप खेळाडूंमधून होत आहे. लॉनसाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत दगड आणि बारीक मुरूम असल्याचे दिसून आले. ‘पोयटा’ ही माती ‘लॉन’साठी उपयुक्त असताना दुसरीच माती वापरली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ कार्यालयात थांबण्याऐवजी इतर कामातच जास्त व्यस्त असल्याने या कामाकडे दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रार आहे.
गुत्तेदारांकडूनही या कामाचे योग्य नियोजन न करता काम केले जात आहे. त्यामुळे यामध्ये निकृष्टता येत असल्याचा आरोप केला जात आहे. हे काम चांगल्या दर्जाचे करून खेळाडूंसाठी दर्जेदार मैदान तयार करावे, अशी मागणी क्रीडाप्रेमी व खेळाडूंमधून केली जात आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी आडसूळ यांच्याशी संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)
लॉनच्या कामासाठी चांगल्या दर्जाची माती असावी. मैदानाच्या मध्यभागी सहा इंच उंची असावी, व त्यांनतर कमी कमी करावी. लॉनच्या बाजूने ट्रॅक असावा. लॉनवरील पाणी जाण्यासाठी चिटकूनच एक छोटी नाली असावी. त्यांनतर ट्रॅक व पुन्हा एक मोठी नाली, असे याचे नियोजन असते. मात्र यापैकी कुठलेच नियोजन येथे केलेले नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे लाखो रूपयाच्या कामावर केवळ पाणी फेरण्याचे काम होत आहे. याकडे मात्र संबंधित गुत्तेदार व जिल्हा क्रीडा अधिकारी साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.