१६ टक्क्याने वाढली लोकसंख्या
By Admin | Updated: July 11, 2014 00:57 IST2014-07-11T00:13:22+5:302014-07-11T00:57:27+5:30
प्रसाद आर्वीकर , परभणी जिल्ह्याच्या लोकसंख्येत दहा वर्षांमध्ये १६ टक्के वाढ झाली आहे़

१६ टक्क्याने वाढली लोकसंख्या
प्रसाद आर्वीकर , परभणी
जिल्ह्याच्या लोकसंख्येत दहा वर्षांमध्ये १६ टक्के वाढ झाली आहे़ लोकसंख्येमध्ये १६ टक्के वाढ झाली असली तरी दहा वर्षाच्या रोजगाराच्या संधी, आरोग्य सुविधा आणि भौतिक सुविधांमध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे परभणी जिल्हा विकासापासून दूर राहिला आहे.
कुठल्याही क्षेत्राच्या विकासासाठी लोकसंख्या हा मूळ घटक मानला जातो. मागील काही वर्षांपासून देशाला लोकसंख्येची समस्या भेडसावत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या वाढत आहेत. वाढलेल्या लोकसंख्येमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. वाढती लोकसंख्या आणि तिची वाढण्याची प्रवृत्ती या दोन्ही बाबी अत्यंत गंभीर बनल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येचा भार शेतीवर पडत असून, बेरोजगारीची समस्या कायम आहे. दारिद्र्य, भांडवल निर्मितीच्या दरावरही लोकसंख्या वाढीचा प्रतिकुल परिणाम होत आहे.
परभणी जिल्ह्याचा विचार केला तर २००१ मध्ये झालेल्या जनगणनेत जिल्ह्याची लोकसंख्या १५ लाख २७ हजार ७१५ एवढी होती. दहा वर्षांनी २०११ मध्ये जनगणना झाली. त्यात जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख ३६ हजार ८६ झाली. याचाच अर्थ दहा वर्षांत जिल्ह्याची लोकसंख्येत ३ लाख ८ हजार ३७१ एवढी वाढ झाली आहे. २००१ च्या लोकसंख्येच्या १६ टक्के ही वाढ आहे. लोकसंख्या वाढली परंतु त्या तुलनेत रोजगाराची संधी, भौगोलिक क्षेत्र, आरोग्य सुविधा तुलनेने वाढलेल्या नाहीत. समाजात जाणवणाऱ्या इतर समस्यांचे मूळ लोकसंख्या वाढीच्या समस्येत आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या भस्मासूर रोखण्यासाठी लोकजागृती हेच एकमेव औषध असून, त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्नांची आवश्यकता आहे.
साक्षरतेतही झाली वाढ
जिल्ह्याची लोकसंख्या वाढली असली तरी २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील साक्षर लोकांची संख्या वाढली आहे़ २००१ मध्ये ८४२५३६ लोक साक्षर होते़ तर २०११ च्या जनगणनेनुसार ११ लाख ५७ हजार ८१४ नागरिक साक्षर आहेत़ यामध्ये ६ लाख ६६ हजार २९१ पुरुष आणि ४ लाख ९१ हजार ५२३ साक्षर महिलांचा समावेश आहे़ तर २००१ मध्ये ५ लाख १६ हजार ७१४ पुरुष आणि ३ लाख २५ हजार ८२२ महिला साक्षर होत्या़ त्यामुळे लोकसंख्या वाढली असली तरी जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाणही वाढल्याचे समोर आले आहे़
अडीच लाख बालके
या जिल्ह्यामध्ये ० ते ६ या वयोगटात २ लाख ५७ हजार ३२० बालकांची नोंद झाली आहे़ परभणी तालुक्यात ७३ हजार ५७८ बालके आहेत़ सेलू तालुक्यात २३ हजार ४०४, जिंतूर तालुक्यात ४१ हजार ५२२, मानवत तालुक्यात १६ हजार १६६, पाथरी तालुक्यात २० हजार १५३, सोनपेठ १२ हजार ६६५, गंगाखेड २८ हजार २८८, पालम १६ हजार ३६० तर पूर्णा तालुक्यामध्ये २५ हजार १८२ बालके आहेत़
अकरा गावे बेचिराख
२००१ मध्ये जेव्हा जनगणना झाली होती़ त्यावेळी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यामध्ये ११ गावे अशी आहेत की त्या ठिकाणी आता काहीही राहिले नाही़ ऊसतोड कामगार अथवा इतर रोजगाराच्या निमित्ताने एखाद्या ठिकाणी वसाहत निर्माण होते़ परंतु, रोजगाराच्या संधी संपल्या की ही वसाहत नामशेष होते़ अशी ११ गावे तेथील नागरिक स्थलांतरित झाल्यामुळे बेचिराख झाल्याची नोंद २००१ च्या जनगणनेमध्ये झाली आहे़
जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी प्रभातफेरी व मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे़ सकाळी ७़३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून या रॅलीला प्रारंभ होईल़ नारायण चाळ, गांधी पार्क, शिवाजी चौक, नानलपेठ, शनी मंदिर रोड, महाराणा प्रताप चौक, जाम नाका मार्गे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या रॅलीचा समारोप होणार आहे़ या रॅलीसाठी लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था तसेच जनतेचे सहकार्य घेण्यात येईल़
तरच आर्थिक विकास शक्य
वाढती लोकसंख्या हा जगापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारतात जगाच्या लोकसंख्येच्या १६ टक्के लोक राहतात. परंतु भारताचा भूभाग मात्र जगाच्या एकूण भूभागाच्या २.४२ टक्के आहे. भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे. मात्र क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा सातवा क्रमांक लागतो.
लोकसंख्या वाढीचे ठळक परिणाम म्हणजे अतिरिक्त लोकसंख्येचा शेतीवरील वाढता भार, वाढलेली बेरोजगारीची समस्या दारिद्रयाची भिषणता आणि भांडवल निर्मितीच्या दरावर प्रतिकूल प्रभाव हे होय़ भारताची वेगाने वाढणारी लोकसंख्या ही समस्या आहे आणि ही समस्या अनेक समस्यांच्या निर्मितीला कारणीभूत ठरली आहे़ त्यामुळे लोकसंख्या वाढीच्या प्रश्नाला प्रभावीपणे हताळल्याशिवाय आर्थिक विकास व सुसंस्कृत सामाजिक जीवन शक्य होणार नाही, असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ व्ही़ आऱ मेकाने यांनी व्यक्त केले़
यावर्षी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात जागतिक लोकसंख्या दिन राबविण्यात येणार आहे़ करु या कुटूंबाचे नियोजन, आनंदी राहू प्रत्येक जण हे यावर्षीचे घोषवाक्य आहे़ याअंतर्गत २७ जून ते १० जुलै दाम्पत्य संपर्क पंधरवाडा राबविण्यात आला़ तर ११ ते २४ जुलै या काळात लोकसंख्या स्थीरता पंधरवाडा राबविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले़
जिल्ह्याची तालुकानिहाय लोकसंख्या
तालुका २००१२०११परभणी४६०७७८५३७८१०
सेलू१३९३५२१६९१७४
जिंतूर२३४४०५२८२७५६
मानवत९७०२४११६८१७
पाथरी११०२१८१३९०४६
सोनपेठ६६७४८८९५८२
गंगाखेड१६४०८०२०२८६७
पालम९२८०४११५३८२
पूर्णा१६२३०६१८२६५२
एकूण१५२७७१५१८३६०८६