पेरणीची शाश्वती संपल्याने डाळी कडाडल्या
By Admin | Updated: July 2, 2014 01:01 IST2014-07-02T00:49:27+5:302014-07-02T01:01:51+5:30
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद जून महिना संपत आला; पण पावसाने दडी मारल्याने उडीद-मुगाची पेरणी झालीच नाही.

पेरणीची शाश्वती संपल्याने डाळी कडाडल्या
प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद
जून महिना संपत आला; पण पावसाने दडी मारल्याने उडीद-मुगाची पेरणी झालीच नाही. पेरणीची शाश्वती न राहिल्याने बाजारपेठेत त्याचा त्वरित परिणाम दिसून आला. उडीद-मूग डाळीच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी भाव वधारले. करडी व शेंगदाणा तेलातील तेजीने फोडणी देणेही महागले. साखरेच्या भावातही चढ-उतार दिसून आला. एकंदरीत मागील आठवड्यात महागाईने सर्वसामान्यांना होरपाळून काढले.
रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. लवकरच चातुर्मासाला आरंभ होणार आहे. तसेच आषाढी एकादशी आठवड्यावर येऊन ठेपली आहे. जुलै महिन्यापासून उपवास, व्रत, धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले जाणार आहेत. दुसरीकडे जून महिना संपत आला तरीही मान्सून सक्रिय झाला नाही. परिणामी, उडीद व मुगाची ९९ टक्के पेरणी झालीच नाही. जिथे १ टक्का पेरणी झाली तिथे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. १० जुलैच्या आत मान्सून सक्रिय झाला तरीही उडीद व मुगाच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ होणार नाही. कारण, येत्या १० दिवसांत पेरणी केली तरीही उत्पादनात घट होणार आहे. नजीकच्या भविष्यात डाळी बाजारपेठेत येण्याची शाश्वती नसल्याने बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी मागील वर्षीच्या शिल्लक डाळींचे भाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात ३०० रुपयांनी महागून मूग डाळ ७,८०० ते ८,४०० रुपये, उडीद डाळीत २०० रुपये वाढून ६,८०० ते ७,७०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. याचा परिणाम अन्य डाळींवरही झाला. यातही २०० ते ३०० रुपये तेजी येऊन हरभरा डाळ ३,००० ते ३,६०० रुपये, तूर डाळ ५,८०० ते ६,२०० रुपये, मठ डाळ ७,५०० ते ७,७०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली, अशी माहिती कमिशन एजंट प्रकाश जैन यांनी दिली.
करडी, शेंगदाणा तेल आणखी महागले
एकीकडे करडी बीची आवक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. करडी पेंडचे भाव उतरले आहेत. परिणामी, करडी बी महागले. भुईमुगाचे उन्हाळी पीक कमी आले. दुसरीकडे रमजान महिना, चातुर्मास, आषाढी एकादशीने खाद्यतेलाला मागणी वाढल्याने याचा एकंदरीत परिणाम खाद्यतेलाच्या भाववाढीवर झाला आहे. करडी तेलाच्या भावात मागील १५ दिवसांत लिटरमागे १० रुपयांची वाढ होऊन साधे ९५ रुपये व डबल फिल्टर १०० रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. शेंगदाणा तेलाच्या भावातही ५ रुपयांनी वाढ होऊन साधे ९० रुपये, तर डबल फिल्टर ९५ रुपये प्रतिलिटर विकले जात आहे, अशी माहिती खाद्यतेल विक्रेते जगन्नाथ बसैये यांनी दिली.
गेल्यावर्षीच्या तुलनेत तांदूळ महागच
मागील वर्षी तांदूळ कमीत कमी २,२०० ते ९,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विक्री झाला होता. यंदा बाजारात २,५०० ते १५,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत तांदूळ विकला जात आहे. ओरिजनल बासमती तांदळाचा भाव प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचल्याने बासमतीची विक्री नगन्य राहिली आहे.