गरीबांना मिळत नाही अन्नसुरक्षा
By Admin | Updated: July 9, 2014 00:09 IST2014-07-08T23:36:27+5:302014-07-09T00:09:42+5:30
परभणी : मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथे अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धनदांडग्या व नोकरदार वर्गाचा लाभार्थ्यांत समावेश केला आहे.

गरीबांना मिळत नाही अन्नसुरक्षा
परभणी : मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथे अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धनदांडग्या व नोकरदार वर्गाचा लाभार्थ्यांत समावेश केला आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील हे धान्य वाटप होत नसल्याची तक्रार येथील काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोल्हावाडी येथे अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप झाले. जी यादी या दुकानदाराकडे आहे व ज्यांना धान्य वाटप झाले ते बहुतांश कुटुंब १० ते ५० एकर जमिनीचे मालक व शासकीय नोकरदार आहेत. प्रत्यक्ष मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्यांची नावे या यादीतून वगळली आहेत.
त्याच प्रमाणे कोल्हावाडी येथील स्वस्तधान्य दुकानदार धान्य वाटप न करता काळ्या बाजारात विक्री करतो. त्यामुळे धान्य वाटप रजिस्टर व लाभार्थ्यांच्या सह्या तपासाव्यात व दुकानदाराची चौकशी करावी, अशी मागणी उत्तमराव भिसे, भरत भिसे, मदन भिसे, वसंत भिसे, अशोक भिसे, शिवाजी भिसे, श्रीरंग भिसे आदी ४८ ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)
मजुरावर उपासमारीची वेळ
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांच्या हाताला काम नाही. बाजारात धान्य महागले आहे. त्यामुळे या मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. गरीबांसाठी राबविलेल्या या योजनेत पात्र गोर गरीब लोकांची नावे समाविष्ट करावी व अन्न सुरक्षा योजनेतून धान्य वाटप करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.