पोनि. मिसाळ यांच्या चौकशीचे आदेश
By Admin | Updated: December 4, 2014 00:53 IST2014-12-04T00:37:40+5:302014-12-04T00:53:55+5:30
लातूर : बहुचर्चित कल्पना गिरी खून प्रकरणात पदाचा गैरवापर करून खोटी साक्ष नोंदविल्याची याचिका स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत गुणाजी मिसाळ यांच्याविरुद्ध

पोनि. मिसाळ यांच्या चौकशीचे आदेश
लातूर : बहुचर्चित कल्पना गिरी खून प्रकरणात पदाचा गैरवापर करून खोटी साक्ष नोंदविल्याची याचिका स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत गुणाजी मिसाळ यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी ४ आठवड्यांच्या आत चौकशी पूर्ण करावी, असे आदेश खंडपीठाने लातूरच्या पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.
कल्पना गिरी खून प्रकरणात पोलिस निरीक्षक भागवत मिसाळ यांनी पदाचा गैरवापर करून आपल्याला गुन्ह्याचा साक्षीदार बनविले, अशी याचिका खंडू पांडुरंग मगर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. २० मार्च २०१४ रोजी हॉटेल ग्रँड येथे आपली पगार आणण्यासाठी गेलो असता कल्पना गिरी मृत्यू प्रकरणातील तपासी अधिकारी मिसाळ यांनी या प्रकरणात गुन्ह्याचा साक्षीदार बनविले. हॉटेल नर्तकी, बार अॅण्ड रेस्टॉरंट येथे खोटी उपस्थिती दाखवून टिपण तयार केले, अशी याचिका याचिकाकर्ते खंडू मगर यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली.
जनहित याचिका स्वरूपात ही याचिका औरंगाबाद खंडपीठाने स्वीकारून पोलिस अधीक्षकांना या संबंधी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चार आठवड्यांच्या आत या याचिकेच्या अनुषंगाने चौकशी पूर्ण करावी, असे खंडपीठाने या आदेशात म्हटले आहे. एस.एस. शिंदे व एआयएस चिमा यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले असून, याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड.व्ही.डी. सपकाळ यांनी न्यायालयात बाजू मांडली, तर अॅड. पी.एस. सोनकांबळे यांनी त्यांना सहकार्य केले. (प्रतिनिधी)
हस्ते-परहस्ते संबंधित पोलिस निरीक्षकाकडून धमकावले जात असल्याचा आरोप याचिकाकर्ते खंडू मगर यांनी केला आहे. शिवाय, पोलिस निरीक्षक मिसाळ यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी याचिकाही लातूरच्या जिल्हा न्यायालयात दाखल केली असल्याची माहिती अॅड.पी.एस. सोनकांबळे यांनी दिली आहे.
साक्ष संदर्भात चौकशी करावी, असे न्यायालयाचे आदेश आले आहेत. चार आठवड्यांची मुदत दिली असून, न्यायालयाच्या निर्देशानुसार चौकशी केली जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.