परंडा तालुक्याला ‘फ्लोराईड’चा धोका !
By Admin | Updated: February 5, 2015 00:54 IST2015-02-05T00:49:36+5:302015-02-05T00:54:09+5:30
उस्मानाबाद : जिल्हाभरातील ५ हजार ८७५ पैकी २ हजार ८८२ जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात आली असता सुमारे साडेसातशे स्त्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य आहे.

परंडा तालुक्याला ‘फ्लोराईड’चा धोका !
उस्मानाबाद : जिल्हाभरातील ५ हजार ८७५ पैकी २ हजार ८८२ जलस्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात आली असता सुमारे साडेसातशे स्त्रोतांचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. यापैकी परंडा तालुक्यातील सर्वाधिक १०२ जलस्त्रोतांमध्ये ‘फ्लोराईड’ आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित स्त्रोतांचे पाणी पिण्यासाठी वापरू नये, असे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
जिल्हा पाणी स्वच्छता कक्षांतर्गत पाणी गुणवत्ता विभागाच्या माध्यमातून रासायनिक तपासणी अभियान सुरू करण्यात आले होते. या माध्यमातून डिसेंबर २०१४ ते जोनवारी २०१५ या कालावधीत जिल्हाभरातील किमान ५ हजार ८७५ स्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करणे अपेक्षित होते. परंतु, पन्नास टक्क्यांच्या आसपास स्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे २ हजार ८८२ नमुन्यांचीच तपासणी होवू शकली. यापैकी ७४३ स्त्रोतांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्रयोगशाळांनी संबंधित कक्षाला सादर केला आहे. यामध्ये उस्मानाबाद-तुळजापूर तालुक्यातील ३३९, परंडा-भूम तालुक्यातील ३२३, उमरगा-लोहारा तालुक्यातील ७६ आणि वाशी-कळंब तालुक्यातील पाच स्त्रोतांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हभरात १४४ स्त्रोतांमध्ये ‘फ्लोराईड’ आढळून आले असता यापैकी १०२ स्त्रोत हे एकट्या परंडा तालुक्यातील आहेत. त्याचप्रमाणे उस्मानाबाद ३६ आणि उमरगा-लोहारा तालुक्यांतील ६ स्त्रोतांमध्ये फ्लोराईड असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उपरोक्त तालुक्यांसाठी ही बाब धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, फ्लोराईडयुक्त पाणी मानवी आरोग्यासाठी घातक असल्याने त्याचा पिण्यासाठी वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश पाणी गुणवत्ता विभागाकडून संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. तसेच स्त्रोतांचे शुद्धीकरण करण्याच्याही सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी करण्याची सोय चार ठिकाणी आहे. त्यानुसार उस्मानाबादच्या प्रयोगशाळेत ९४०, परंडा ८०२, उमरगा ५८३ आणि वाशी येथील प्रयोगशाळेमध्ये ५५७ स्त्रोतांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७४३ स्त्रोतांचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.