तलाव कोरडे; चिंता वाढली
By Admin | Updated: August 3, 2014 01:15 IST2014-08-02T23:38:22+5:302014-08-03T01:15:48+5:30
एम़जी़मोमीन , जळकोट तालुक्यातील १२ साठवण तलावांनी तळ गाठला आहे़ केवळ १३ टक्के पाणीसाठा आहे़ परिणामी दिवसेंदिवस पाण्याची समस्या उग्र बनत असल्याने शेतकऱ्यांसह पशूपालक धास्तावले आहेत़

तलाव कोरडे; चिंता वाढली
एम़जी़मोमीन , जळकोट
तालुक्यातील १२ साठवण तलावांनी तळ गाठला आहे़ केवळ १३ टक्के पाणीसाठा आहे़ परिणामी दिवसेंदिवस पाण्याची समस्या उग्र बनत असल्याने शेतकऱ्यांसह पशूपालक धास्तावले आहेत़
तालुक्यातील ढोरसांगवी, जिरगा, कोळनूर, माळहिप्परगा, चेरा, गुप्ती, हाळद वाढवणा, कोनाळी, विराळ आदी गावांत १२ साठवण तलाव आहेत़ गेल्या वर्षी हे तलाव तुडुंब भरले होते़ यंदा मात्र तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्याने तलावातील पाणीसाठा मृत अवस्थेत आहे़
गेल्या वर्षी साठवण तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली होती़ तब्बल दोन हजार हेक्टरवर ऊसाची लागवड आहे़ यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाने पाठ फिरवल्याने साठवण तलावांनी तळ गाठला आहे़ परिणामी शेतकऱ्यांचे ऊस वाळत आहे़ त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभारले आहे़
तालुक्यातील अनेक गावांना नजीकच्या साठवण तलावांतून पाणीपुरवठा होतो़ परंतु, साठवण तलावात पाणीसाठा नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे़ आॅगस्ट महिना उजाला तरी तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे़ तसेच तालुक्यातील ऊस उत्पादकांचा, शेतकऱ्यांच्या खरीपाचा शासनाने तात्काळ सर्व्हे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे़ पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे़ त्यामुळे आकाशाकडे डोळे लागले आहेत़
बालाजी थेटे ल्ल औराद शहाजानी
निम्मा पावसाळा संपला़ मात्र, या भागात अद्यापही मोठा पाऊस झाला नाही़ परिणामी पेरण्या खोळंबल्या आहेत़ तसेच तेरणा, मांजरा नद्या कोरड्या पडल्या आहेत़ त्यामुळे या नद्यांवरील आठही कोल्हापुरी बंधारे कोरडी आहेत़
पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले आहेत़ परंतु, या भागात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही़ औराद परिसरात जून महिन्यात ७५ मी़मी़ तर जुलै महिन्यात ७८ मी़मी़ इतका पाऊस पडला आहे़ अल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे़ पाऊस नसल्याने उगवलेली पिके वाळून जात आहेत़ दमदार पाऊस नसल्याने अद्यापही मांजरा व तेरणा नद्या कोरड्या आहेत़ परिणामी या नद्यांवरील औराद, तगरखेडा, वांजरवाडा, तुगाव, सोनखेड, किल्लारी, मदनसुरी, मुजरगा ही कोल्हापुरी बंधारे कोरडी आहेत़ पाणीसाठाच नसल्याने पाणीपुरवठ्याच्या योजनाही बंद पडल्या आहेत़