प्रत्येक हातात पोहोचणार पोलचिट
By Admin | Updated: October 6, 2014 00:13 IST2014-10-06T00:01:39+5:302014-10-06T00:13:45+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत पोलचिट वाटप दोन दिवसांत सुरू होणार आहे

प्रत्येक हातात पोहोचणार पोलचिट
लातूर : लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत पोलचिट वाटप दोन दिवसांत सुरू होणार आहे. १३ आॅक्टोबरपूर्वी वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, आयोगाच्या या पोलचिटवर मतदान केंद्राची माहिती देण्यात येणार आहे.
मतदारांना वाटप करण्यात येत असलेल्या पोलचिटवर मतदाराचे छायाचित्र, मतदान केंद्राचे नाव, ज्या परिसरात मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्राचा उल्लेख या पोलचिटवर असणार असून, आयोगाने दिलेले ओळखपत्र मतदारांकडे नसेल, तर या पोलचिटच्या आधारे मतदारांना मतदान करता येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रनिहाय वाटपाची प्रक्रिया करण्यात येत आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ३ लाख २८ हजार २६५ मतदार आहेत. त्यादृष्टीने पोलचिट छापण्यात आल्या आहेत. लातूर ग्रामीणमध्ये २ लाख ९३ हजार ५६१, अहमदपूर विधानसभा मतदारसंघात २ लाख ८९ हजार ४६९, उदगीर विधानसभा मतदारसंघात २ लाख ७० हजार ८८०, निलंगा विधानसभा मतदारसंघात २ लाख ८५ हजार ३४ आणि औसा विधानसभा मतदारसंघात २ लाख ५७ हजार १३० असे एकूण जिल्ह्यात १७ लाख २४ हजार ३३९ मतदार आहेत. ही मतदारांची संख्या लक्षात घेऊन पोलचिट जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत छापण्यात येत आहेत. दोन दिवसांनंतर विधानसभानिहाय मतदारसंघांतील प्रत्येक केंद्रांतर्गत मतदान केंद्राध्यक्षांच्या टीमच्या वतीने या पोलचिटचे वाटप होणार आहे. सर्व मतदारांना निवडणूक आयोगाची मतदान चिठ्ठी मिळणार आहे. प्रत्येक मतदारांच्या हाती निवडणूक आयोगाची मतदान चिठ्ठी पडावी, यादृष्टीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत.
प्रत्येक घरोघरी जाऊन पोलचिट देण्यात येणार आहे. यापूर्वी उमेदवारांना पोलचिट वाटपाची परवानगी होती. परंतु, गेल्या लोकसभा निवडणुकीपासून मतदान चिठ्ठी आयोगामार्फत वाटण्यात येत आहे. उमेदवारांकडून वाटप करण्यात येत असलेल्या पोलचिटवर पक्षाचे चिन्ह व त्याची जाहिरातबाजी होत असे. त्यामुळे आयोगाने हे निर्बंध घालून स्वत: मतदान चिठ्ठी वाटपाचा निर्णय गेल्या लोकसभा निवडणुकीपासून घेतला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक केंद्रावर वाटपाची प्रक्रिया सुरू होत आहे. (प्रतिनिधी)