रोहित्रावरून ‘श्रेयवादा’चे राजकारण...!
By Admin | Updated: December 29, 2016 22:53 IST2016-12-29T22:50:24+5:302016-12-29T22:53:07+5:30
बीड रबी हंगाम सुरू झाल्यापासून विभागात रोहित्रांची टंचाई भेडसावत आहे.

रोहित्रावरून ‘श्रेयवादा’चे राजकारण...!
राजेश खराडे बीड
रबी हंगाम सुरू झाल्यापासून विभागात रोहित्रांची टंचाई भेडसावत आहे. आठ दिवसांपूर्वी विभागाकरिता १०० रोहित्रांचा पुरवठा झाल्याने प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या रोहित्रांचा जिव्हाळ्याच्या प्रश्नात लोकप्रतिनिधींनी उडी घेतली असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या ३-४ वर्षांपासून कृषी पंप बंद होते; मात्र यंदा अतिवृष्टीमुळे मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे. त्यामुळे कृषी पंपांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असल्याने रोहित्र बिघाडाचे प्रमाण वाढले आहे. दुरुस्तीसाठी दाखल केलेले रोहित्र मिळविण्याकरिता शेतकऱ्यांनी महावितरणच्या दारी खेटे मारले आहेत. येथील विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनीही रोहित्राच्या पूर्ततेसाठी इतर विभागांशी संपर्क साधून रोहित्रे मिळविली होती. त्यातच डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ऊर्जामंत्र्यांकडून बीड विभागाकरिता ४०० रोहित्र पूर्ततेचे आश्वासन देण्यात आले होते. त्यापैकी जिल्ह्याकरिता १०० रोहित्रांचा पुरवठा झाला असल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे.
अधिकाऱ्यांचे परिश्रम व शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या रोहित्रांचे श्रेय आता लोकप्रतिनिधी लाटू पाहत आहेत. केवळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर हे राजकारण केले जात असल्याचे दिसत आहे. रोहित्राचा प्रश्न बाजूला ठेवून केवळ माझ्यामुळे हे शक्य झाले, असा दावा हे लोकप्रतिनिधी करताना दिसत आहेत.
रोहित्रे मिळविण्याकरिता वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या अरेरावीची भाषेला सामोरे जावे लागले. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.