बाजार प्रकरणात राजकारणाचा वास; शिवसेनेत पडले दोन गट
By Admin | Updated: July 23, 2014 00:42 IST2014-07-23T00:30:14+5:302014-07-23T00:42:06+5:30
औरंगाबाद : शहागंज ते सिटीचौकपर्यंतच्या रस्त्यावर बाजार भरल्यामुळे शिवसेनेत त्यावरून दोन गट पडले आहेत. या सगळ्या प्रकारामागे राजकारणाचा वास येऊ लागला आहे.

बाजार प्रकरणात राजकारणाचा वास; शिवसेनेत पडले दोन गट
औरंगाबाद : शहागंज ते सिटीचौकपर्यंतच्या रस्त्यावर बाजार भरल्यामुळे शिवसेनेत त्यावरून दोन गट पडले आहेत. या सगळ्या प्रकारामागे राजकारणाचा वास येऊ लागला आहे.
माजी आ. किशनचंद तनवाणी व त्यांच्या समर्थकांनी त्या बाजार प्रकरणात मनपा, पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. आ. प्रदीप जैस्वाल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्यामुळे दिवसभर व्यापाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. आ.जैस्वाल व त्यांचे समर्थक या प्रकरणात कुठेही दिसले नाहीत. रस्त्यांत बाजार भरविण्यासाठी पोलिसांवर कोणत्या नेत्याने दबाव आणला. यावरूनही व्यापाऱ्यांमध्ये चर्चेचे पेव फुटले होते.
विधानसभा निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना रस्त्यावरील बाजारावरून सेनेतील गटबाजीचे राजकारण चव्हाट्यावर आले आहे.
तीन दिवसांपासून धावणी मोहल्ल्यातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात व्यापाऱ्यांच्या बैठकाही झाल्या. गेल्या आठवड्यापासून मनपा, पोलिसांकडे निवेदन देऊनही व्यापाऱ्यांची व त्या परिसरातील नागरिकांची व्यथा कुणीही ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे शेवटी वैतागून सराफा व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला.
बाजार दरवर्षी भरतो. मात्र, यावर्षी बाजारातील विके्रत्यांची व हातगाड्यांची संख्या दुप्पट झाली. मध्य मतदारसंघामध्ये शिवसेनेतील दोन गटांपैकी एका गटाने व्यापारी, वाहतुकीची कोंडी समोर आणून दुसऱ्या गटाची कोंडी केली. तर रिपब्लिकन सेनेने मनपाच्या अधिकाऱ्यांवर व पोलिसांना अरेरावी करून बाजारातील विके्रत्यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडींवरून शहागंजच्या रस्त्यावरील बाजारावरून मोठे राजकारण होणार असल्याचे दिसते.
अशीही दिशाभूल...
शहागंज रस्त्यावरील बाजार पारंपरिक असल्याचे पोलीस आयुक्तांना सांगण्यात आल्यामुळे त्यांनीही त्याकडे लक्ष दिले नाही. दरवर्षी मीना बाजार भरत असे. मागील सात वर्षांपासून तो बाजार भरणे बंद झाले. त्यानंतर सिटीचौक परिसरातील फुटपाथवरच चार दिवसांसाठी तो बाजार भरण्याचा प्रघात पडला.
यावर्षी मात्र, सिटीचौक पोलीस ठाण्यापर्यंत दोन्ही बाजूंनी आणि मध्यभागी आठवड्यापूर्वीच बाजार भरल्यामुळे नागरिकांची व त्या भागातील व्यापाऱ्यांची कोंडी झाली.
स्कूल बस येणे बंद झाले, गर्दीमुळे महिलांना लांबून जावे लागते आहे. बाजार भरण्यास व्यापाऱ्यांचा विरोध नाही. मात्र, सार्वजनिक रस्त्यावरच बाजार भरणे हे कुणाच्याही हिताचे नाही, असे नगरसेवक सिद्ध म्हणाले.