राजकीय सुडापोटी आमच्यावर गुन्हे नोंदविले
By Admin | Updated: January 28, 2017 23:37 IST2017-01-28T23:34:32+5:302017-01-28T23:37:32+5:30
उस्मानाबाद : समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या, सत्य मांडणाऱ्यांना गोळ्या घातल्या जात आहेत़

राजकीय सुडापोटी आमच्यावर गुन्हे नोंदविले
उस्मानाबाद : समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या, सत्य मांडणाऱ्यांना गोळ्या घातल्या जात आहेत़ बहुजन समाजाच्या वाट्याला येणाऱ्या दु:खाची कारणे शोधण्यासाठी व्यवस्थेला प्रश्न विचारणारे तरूण इथल्या व्यवस्थेला नको आहेत. परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी होऊ इच्छिणारे तरूण खचून जावेत म्हणूनच राजकीय सुडापोटी आमच्या सारख्या अनेक तरुणांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचे प्रतिपादन क्रांतीशाहीर सचिन माळी यांनी व्यक्त केले़ भारता युवा मंचच्या वतीने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते़
उस्मानाबाद येथील भारत युवा मंच वतीने दोन वर्ष भूमिगत आणि चार वर्ष कारावासानंतर जामिनावर सुटका झालेल्या क्रांतीशाहीर सचिन माळी यांचा शहरातील प्रतिष्ठित आणि जेष्ठ नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी अंनिसचे एम़डी़ देशमुख, समाजसेवक सदाशिव बनसोडे, नगरसेवक युवराज नळे, नगरसेवक तथा आरोग्य सभापती सिद्धार्थ बनसोडे, नगरसेवक माणिक बनसोडे, विद्याताई एडके, समाजकल्याण सभापती हरीश डावरे, संजय वाघमारे, भाऊसाहेब अंदूरकर, हुंकार बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ जातीअंताच्या उंबरठ्यावर सध्या देश उभा आहे. अशा काळात जातीय अस्मिता अधिक टोकदार होवून पुढे येत आहे. त्यामुळे शोषित दु:खी मराठे, ओबीसी बांधव आणि पिचलेला दलित वर्ग यांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगून सचिन माळी म्हणाले, विवेकाची चळवळ समाजात रूजविण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी प्रयत्न केले, त्यांना आजवर दडपशाहीचा मुकाबला करावा लागला आहे. दडपशाहीच्या या ऐतिहासिक परंपरेच्या रगड्यातून आमच्यासारखे अनेक सामान्य कुटुंबातील तरूण सध्या चिरडले जात आहेत. जाती व्यवस्थेचे चटके आम्ही सहन केले आहेत. त्यामुळेच आमच्या ओठावर अश्रूंचे गाणे येते. अशा गाण्यांच्या माध्यमातून विवेकवादाचा पुरस्कार करणाऱ्या समाजनायकांवर आम्ही कविता लिहिल्या. मग आम्ही नक्षलवादी कसे, असा सवालही माळी यांनी यावेळी उपस्थित केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत युवा मंचचे भाऊसाहेब अंदूरकर, शीतल वाघमारे, हुंकार बनसोडे, अविनाश ननवरे, सतीश जाधव, अक्षय गायकवाड, रेवण काकडे, सचिन अंदूरकर आदीनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)