राजकीय ध्रुवीकरण
By Admin | Updated: June 24, 2017 23:39 IST2017-06-24T23:35:40+5:302017-06-24T23:39:23+5:30
बीड : राजकारणातील भाऊबंदकी म्हणजे काय असते, हे बीड जिल्ह्याला नव्याने सांगण्याची आवश्यकता वाटत नाही

राजकीय ध्रुवीकरण
सतीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राजकारणातील भाऊबंदकी म्हणजे काय असते, हे बीड जिल्ह्याला नव्याने सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जिल्हा उघड्या डोळ्याने बघत आहे. मुंडे, पंडित आणि क्षीरसागर घराण्यातील वाद पुन्हा पुन्हा उगाळण्यापेक्षा या वादाचे दुष्परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर, विकासप्रश्नावर, समाजमनावर कसे होत आहेत, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
या भाऊबंदकीला सत्तेच्या महत्त्वाकांक्षेची किनार आहे. माझ्यापेक्षा दुसरा कुणी मोठा होऊच नये, अशी वृत्ती आहे. स्वत:पेक्षा दुसऱ्याच्या पानात आधी वाढण्याचे संस्कार काळाच्या ओघात विसरत चाललो की काय? असे हे सर्व पाहून वाटू लागले आहे. त्यामुळेच ही भाऊबंदकी, सत्तास्पर्धा इतक्या टोकाला जात आहे की, रक्ताच्या नात्याऐवजी कट्टर विरोधकही जवळचा वाटू लागला आहे. एकमेकावर राजकीय चिखलफेक करणारे आता एकमेकाच्या गळ्यात गळा घालताना दिसत आहेत. बीड पं.स. सभापतीपदासाठी शिवसंग्रामला मदत करून पुतण्या संदीपला सत्तेपासून क्षीरसागर बंधूनी रोखले होते. या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आ. विनायक मेटे हे यापूर्वीचे सर्वकाही विसरून बीड पालिकेत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागरांच्या मदतीला धावून गेले. तसे बघितले तर पालिकेतील वाद हा पालिकेच्या सभागृहातच मिटावयास पाहिजे.
परंतु, विकासाच्या गोंडस नावाखाली नगराध्यक्ष क्षीरसागर आणि आ. मेटे मांडीला मांडी लावून पूर्वीचे मतभेद विसरून बसले. घरातील वाद जेव्हा विकोपाला जातो, तेव्हा बाहेरचे जवळचे वाटायला लागतात. राजकीय हेतू काही का असेना?, परंतु या बैठकीत पालिकेतील वाद मिटले असते तर निश्चितच शहराचे भले झाले असते आणि त्याचे श्रेय आ. मेटे यांनाच मिळाले असते. परंतु, या बैठकीत जुटण्याऐवजी अधिक बिघडले. उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागरांचे समर्थक सभापती अमर नाईकवाडे आणि नगराध्यक्ष क्षीरसागर यांच्यात स्वच्छतेवरुन तू तू-मै मै पहावयास मिळाली. बैठक सोडून नाईकवाडे निघून गेले.
पालिकेतील वाद मिटण्यापेक्षा राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या क्षीरसागर बंधू आणि आ. मेटे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचा उघडउघड संदेश जिल्ह्यास देण्यात आला. यानिमित्ताने जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणे होऊ घातली आहेत. त्याची ही सुरूवात आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.