पोलिओसदृश रुग्ण आढळला
By Admin | Updated: September 12, 2014 00:30 IST2014-09-12T00:13:22+5:302014-09-12T00:30:09+5:30
माळीवाडा : जिल्हाभरात डेंग्यूचा झपाट्याने फैलाव होत असताना चार दिवसांपूर्वी आसेगावात पोलिओसदृश रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली.

पोलिओसदृश रुग्ण आढळला
माळीवाडा : जिल्हाभरात डेंग्यूचा झपाट्याने फैलाव होत असताना चार दिवसांपूर्वी आसेगावात पोलिओसदृश रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी आरोग्य विभागाने गावात १० जणांचे पथक पाठवून ४१० बालकांना पोलिओ डोस पाजला.
आसेगाव येथील सुदर्शन गणेश सोनटक्के या पंधरा महिन्यांच्या बालकाचा डावा पाय थोडा बारीक पडून पायात लुळेपणा जाणवू लागला होता. यामुळे त्याच्या आईने चार दिवसांपूर्वी लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांकडून बाळाची तपासणी करून घेतली होती. बाळ पोलिओसदृश आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी डॉक्टरांनी याची कल्पना वरिष्ठांना दिली होती. पर्यवेक्षक पी. बी. नैनाव, जी. के. दिवेकर, श्रीमती एस. आर. तायडे, एस. ए. सिनगारे यांनी परिश्रम घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत हे पथक गावात तळ ठोकून होते. दरम्यान, डॉ. अल्हाट यांनी अंगणवाडी तसेच गावात अनेक ठिकाणी साचलेल्या सांडपाण्याची पाहणी करून ग्रामपंचायतीला डास उत्पत्तीच्या ठिकाणी मुरूम टाकावा, कोणत्याही परिस्थितीत डास उत्पत्ती होणार नाही याकडे लक्ष द्यावे, धूर फवारणी करावी, दर शनिवारी कोरडा दिवस पाळावा आदी सूचना दिल्या.
या बाबत वैद्यकीय अधिकारी पी. एम. अल्हाट यांनी सांगितले की, घाटीमधील डॉक्टरांकडून बाळाच्या हाडाची तपासणी करण्यात आली असून, रिपोर्टही नार्मल आले आहेत. खबरदारी म्हणून या बाळाबरोबर आजबाजूच्या पाच बाळांचे स्टुल सॅम्पल आम्ही तपासणीसाठी मुंबईला पाठविले आहे. (वार्ताहर)