पोलिसांच्या ‘मुस्कटदाबी’ने संताप
By Admin | Updated: May 11, 2016 00:53 IST2016-05-11T00:32:22+5:302016-05-11T00:53:02+5:30
औरंगाबाद : स्वत:चा ताण कमी करण्यासाठी पोलिसांनी जालना रोडवरील आकाशवाणी चौकात बॅरिकेडस् टाकून हा चौकच बंद करून टाकला आहे.

पोलिसांच्या ‘मुस्कटदाबी’ने संताप
औरंगाबाद : स्वत:चा ताण कमी करण्यासाठी पोलिसांनी जालना रोडवरील आकाशवाणी चौकात बॅरिकेडस् टाकून हा चौकच बंद करून टाकला आहे. वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे कारण पुढे करीत पोलिसांनी केलेल्या या ‘मुस्कटदाबी’मुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. हे बॅरिकेडस् काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
जालना रोड ही शहराच्या वाहतुकीची ‘लाईफ लाईन’ समजली जाते. शहरातील जवळपास प्रत्येक वाहनचालकाला दिवसातून एकदा तरी या रस्त्याचा वापर करावाच लागतो. त्यामुळे सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता आहे. वाहनांच्या प्रचंड वर्दळीमुळे आणि जागोजागी असलेल्या अतिक्रमण, अडथळ्यांमुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब बनलेली आहे.
वाहतुकीची ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने या रस्त्यावर सातत्याने नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत. डिझेल रिक्षांना बंदी, सीटर रिक्षांना बंदी, रिक्षांना मीटर सक्ती, हे पोलिसांच्या प्रयोगाचेच भाग आहेत.
आता या रस्त्यावर कमीत कमी चौक ठेवण्याचा प्रयोग पोलीस करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी वाहतूक शाखेने औरंगाबाद खंडपीठासमोर रस्ता ओलांडण्यासाठी असलेली जागा बॅरिकेड्स लावून बंद केली. त्यापाठोपाठ दोन दिवसांपूर्वी तर पोलिसांनी हद्दच केली. शहरातील महत्त्वाच्या चौकांपैकी एक असलेल्या आकाशवाणीजवळील बसवेश्वर चौकातही बॅरिकेडस् लावून येथील वळण बंद करून टाकले. त्यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत. पोलिसांच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांना ‘फटका’
पोलिसांनी सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा चौक बंद केल्यामुळे त्याचा नागरिकांना मोठा ‘फटका’ बसत आहे. एक तर या चौकाच्या दोन्ही बाजंूनी मोठी वसाहत आहे. विशेषत: पोलिसांच्या या निर्णयामुळे जवाहर कॉलनी, त्रिमूर्ती चौक, उल्कानगरी, विष्णूनगर या भागांमधील नागरिकांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे. या परिसरातील वाहनचालकांना जुन्या शहरात किंवा सिडको- हडको भागाकडे जायचे झाल्यास आता एक तर मोंढा नाक्याच्या पुलाखालून वळावे लागत आहे किंवा सेव्हन हिल पुलाखालून जावे लागत आहे. जुन्या शहरातून इकडे यायचे असेल तरीही या दोन्ही पुलांशिवाय पर्यायच राहिलेला नाही.
\वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे कारण सांगत पोलिसांनी हा चौक बंद केला. वास्तविक पाहता या चौकात वाहतुकीचा खोळंबा क्वचितप्रसंगीच होत असे. आता चौक बंद केल्याने येथे खोळंबा होण्याचा प्रश्नच उरला नाही; परंतु मोठा वळसा मारण्याऐवजी वाहनचालक सिडकोकडे जायचे झाल्यास आकाशवाणी चौकापासून थेट सेव्हन हिल पुलापर्यंत ‘राँग साईड’जात आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा अपघाताचा धोका वाढला आहे.
2याशिवाय सर्वच वाहतूक सेव्हन हिल पुलाखाली येत असल्याने येथेही वाहतुकीच्या कोंडीचे प्रमाण वाढले आहे. अशीच परिस्थिती मोंढा नाका पुलाखाली होत आहे. विशेष म्हणजे मोंढा नाका पुलाखालून शिवशंकर कॉलनीकडे जाणारा आणि मोंढ्याकडे जाणारा हे दोन्ही रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवर गर्दी वाढली तर पुन्हा वाहतुकीची कोंडी वाढणार आहे.
आकाशवाणीजवळील चौक हा प्रायोगिक तत्त्वावर बंद करण्यात आला आहे. त्याच्या परिणामांचा वाहतूक शाखा अभ्यास करीत आहे. या निर्णयामुळे वाहतुकीचा खोळंबा कमी झाला आहे. रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांचे मात्र हाल होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जर हा चौक वाहनांसाठी कायम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी पादचाऱ्यांसाठी मात्र व्यवस्था करण्यात येणार आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितरीत्या कसा रस्ता ओलांडता येईल, याचा वाहतूक शाखा अभ्यास करीत आहे. - खुशालचंद बाहेती (सहायक पोलीस आयुक्त)