छत्रपती संभाजीनगर : नागरिकांची लूटमार थांबविण्यासाठी कडेकोट नाकाबंदी केली जात असल्याचा दावा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केलेला असतानाच शहरात पुन्हा तिघांना लुटण्यात आले. यात एका नागरिकाला बेदम मारहाण करत लुटले, तर दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. गेल्या दहा महिन्यांत महिलांना लुटल्याच्या ४७ घटना घडल्या असून अन्य लुटमारीच्या घटनांनी शंभरी ओलांडलेली असताना यातील एकाही घटनेची पोलिस उकल करू शकलेले नाहीत, हे विशेष.
९ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजता न्यू हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या मनीषा कैलास जाधव या पतीसह भाजीपाला खरेदी करण्यासाठी पुंडलिकनगर रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी सरस्वती आर्थोपेडिक रुग्णालयासमोरून जात असताना स्पोर्टस् बाईकवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅमचे सोन्याचे गंठण हिसकावून पोबारा केला. दुसऱ्या घटनेत ४० वर्षीय संगीता राजाराम जेवे (रा. बेगमपुरा) या ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता सिडको बसस्थानकावर बाहेरगावाहून येऊन उतरल्या. गर्दीत चोराने त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅमचे सोन्याचे गंठण तोडून नेले. दोन्ही घटनांप्रकरणी पुंडलिकनगर, एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
बेदम मारहाणीमुळे तरुण गंभीर जखमीखासगी नोकरी करणारे गणेश जाधव (वय ३७, रा. गजानन कॉलनी) हे सिडको चौकाकडून घराच्या दिशेने पायी जात होते. मध्यरात्री १२:३० वाजता पटियाला बँकेसमोर ट्रिपल सीट दुचाकीस्वारांनी त्यांना अडवले. दोघांनी हात पकडून मोबाईल हिसकावला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याच जखमी अवस्थेत त्यांच्या खिशातील १० हजार रुपये हिसकावून दगडावर ढकलून दिले. जाधव यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन हात फ्रॅक्चर झाला. पुंडलिकनगरमध्ये लुटमारीची ही सातवी घटना आहे.
दहा महिन्यांत ४७ सोनसाखळ्या हिसकावल्यागेल्या दहा महिन्यांत शहरात ४७ महिलांच्या सोनसाखळ्या गेल्या. राज्यभरातील विविध गुन्हेगार येऊन लूटमार करून जात आहेत. बहुतांश लुटारू रेकॉर्डवरील असूनही पोलिसांना त्यांचा शोध लावता आलेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळी ६ ते १२ आणि सायंकाळी ६ ते ९ दरम्यान नाकाबंदीचे आदेश दिले. यात कुठलेच गांभीर्य पाळले जात नसल्याने नाकाबंदीचे दावे फोल ठरत आहेत.
Web Summary : Despite police assurances, looting persists in Aurangabad. Three incidents occurred: a man was beaten and robbed, and two women had their necklaces snatched. Police have yet to solve any of the recent cases, which include 47 chain snatchings in ten months.
Web Summary : पुलिस के आश्वासन के बावजूद, औरंगाबाद में लूट जारी है। तीन घटनाएं हुईं: एक आदमी को पीटा गया और लूट लिया गया, और दो महिलाओं की चेन छीन ली गईं। पुलिस ने हाल के किसी भी मामले को हल नहीं किया है, जिसमें दस महीनों में 47 चेन स्नैचिंग शामिल हैं।