पोलीस शिपाई जाळ्यात
By Admin | Updated: May 17, 2017 00:43 IST2017-05-17T00:36:01+5:302017-05-17T00:43:45+5:30
जालना : गुन्हा दाखल न करता तपास कामात मदत करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस शिपाई जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गुन्हा दाखल न करता तपास कामात मदत करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस शिपायावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाच मागणाऱ्या शिपायाचे नाव सचिन कमलाकर फड (वय २६, रा.पोलीस कॉलनी) असून, तो शहरातील कदीम पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराकडे शिपाई सचिन फड याने परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल गुन्ह्यांच्या तपासात मदत करण्याबरोबर हर्सूल जेलमध्ये न पाठविण्यासाठी तीस हजारांची लाच मागितली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, ३१ जानेवारी २०१७ रोजी लाचलुचपत विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये शिपाई फड याने तक्रारदाराकडे तीस हजारांची लाच मागून तडजोडीअंती दहा हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच लाचेची रक्कम आशीर्वाद हॉटेलमध्ये आणून देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. आवश्यक तपासाअंती लाचलुचपत विभागाने मंगळवारी शिपाई सचिन फड याच्याविरुद्ध लाच मागितल्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक व्ही.एल. चव्हाण, कर्मचारी संतोष धायडे, अशोक टेहरे, प्रदीप दौंडे, अमोल आगलावे, रामचंद्र कुदर, नंदू शेंडिवाले, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, गंभीर पाटील, रमेश चव्हाण, म्हस्के, चालक थापा यांनी ही कारवाई केली.