पोलिसांना वाळू तस्करी भोवली
By Admin | Updated: September 11, 2014 01:09 IST2014-09-11T00:55:26+5:302014-09-11T01:09:47+5:30
औरंगाबाद/पाचोड :अवैध वाहतूक तीन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना चांगलीच महागात पडली

पोलिसांना वाळू तस्करी भोवली
औरंगाबाद/पाचोड : गोदावरी नदीपात्रातून वाळूची वाढती अवैध वाहतूक पैठण तालुक्यातील तीन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना चांगलीच महागात पडली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्या तिघांची उचलबांगडी केली आहे.
या तिघांबरोबरच इतरही ६ पोलीस कर्मचाऱ्यांनाही मुख्यालयी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी पदभार हाती घेतल्यानंतर कामचुकार आणि अवैध धंद्याला खतपाणी घालणाऱ्या पोलिसांची झाडाझडती सुरू केली आहे. जिल्ह्यात कुठे अवैध धंधे बंद असल्याचा आव आणला जातो आणि तरीही अवैध धंधे सुरूच आहेत, अशा ठिकाणांची माहिती पोलीस अधीक्षकांनी घेतल्यानंतर ‘सफाई’ सुरू केली आहे. वाळूला सोन्याचा भाव आल्यापासून पैठण येथील गोदावरी नदीतून वाळूच्या तस्करीचा धंधा तेजीत चालला आहे.
वाळू माफियासोबत संबंधित पोलीस ठाण्याचे काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही थाटबाट वाढला आहे.
या सर्व गोष्टींची माहिती घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक कुंभारे यांनी बुधवारी पैठण डिव्हिजनच्या तीन ठाणे प्रभारी अधिकारी आणि ६ कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. यात पैठण ठाण्याचे निरीक्षक सीआर काकडे, एमआयडीसी पैठण ठाण्याचे सहायक निरीक्षक ब्रह्मा गिरी आणि पाचोड ठाण्याचे सहायक निरीक्षक भगवान धबडगे यांचा समावेश आहे. यांच्यासोबत जे ६ कर्मचारी आहेत, त्यांचा वाळू तस्करांशी मधुर संबंध असल्याच्या आणि त्यांच्याही ट्रक-टिप्पर वाळू वाहतूक करीत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाल्या आहेत.
तीन अधिकारी जिल्हा नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले असून कर्मचाऱ्यांना मुख्यालयाचा मार्ग दाखवण्यात आला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्याला नेहमी आशीर्वाद देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. काही दिवसासाठी अवैध धंधे बंद ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक कार्यालयातून एक निरीक्षक आणि त्यांच्या दोन पंटरांनी दोन नंबरवाल्यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यांच्या तक्रारी होत्या - कुंभारे
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अनिल कुंभारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पैठण डिव्हिजनमधील वरील तीनही प्रभारी अधिकाऱ्यांबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या, शिवाय वाळू तस्करीचा मोह जास्त वाढला होता, म्हणून त्यांना जिल्हा पेट्रोलिंगसाठी नियंत्रण कक्षात संलग्न केले आहे. लवकरच त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्त्या केली जाणार आहे.
उचलबांगडी करण्यात आलेल्या तीनही अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात बसून न ठेवता त्यांना पैठण तालुका सोडून इतर तालुक्यात रात्रीची दडोरा प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.