चायनीज मांजाकडे पोलिसांची ढील, विक्रीमुळे वाढला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:09 IST2021-01-08T04:09:10+5:302021-01-08T04:09:10+5:30
वैजापूर : चायनीज व नायल़ॉन मांजाच्या वापरावर बंदी असूनदेखील त्याचा वापर व विक्री सर्रासपणे होत असल्याचे समोर आले आहे. ...

चायनीज मांजाकडे पोलिसांची ढील, विक्रीमुळे वाढला धोका
वैजापूर : चायनीज व नायल़ॉन मांजाच्या वापरावर बंदी असूनदेखील त्याचा वापर व विक्री सर्रासपणे होत असल्याचे समोर आले आहे. त्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.
तालुक्यात नायलॉन मांजावरील बंदी केवळ कागदावरच आहे. कारण शहरातील गल्लीबोळातील दुकानांमध्ये सर्रासपणे विक्री सुरू आहे. गेल्यावर्षी तालुक्यात मांजामुळे एका युवकाचा पाय कापला गेला होता, तर जवळपास ९० पक्ष्यांचा मृत्यू झाला असल्याचे पक्षीमित्र रमेश लिंगायत यांनी सांगितले.
मकरसंक्रांतीचा सण जसाजसा जवळ येतो तशी तालुक्यात मांजा विक्री झपाट्याने वाढू लागते. गेल्या आठवड्यातच वैजापूर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तीनजणांना ताब्यात घेतले. मात्र, ही कारवाई करूनदेखील तालुक्यात चायनीज मांजा विक्री अद्यापही थांबलेली नाही. एवढेच नाही तर वैजापूरला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्यातून छुप्या पद्धतीने मांजा विक्रीसाठी शहरात येत असल्याचे विशेष सूत्रांनी सांगितले. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरात व ग्रामीण भागातील नागरिकांनी नायलॉनसारख्या घातक मांजा वापरू नये, असे आवाहन पक्षीप्रेमी चेतन राजपूत यांनी केले.
-------------
चिमण्यांचा मृत्यू
चिमण्यासाठी गॅलरीत अन्नधान्य व पाणी व्यवस्था केली. परंतु, या पतंगबाजीमुळे नायलॉन मांजा कटल्यावर खाली येतो. हा मांजा नेमका त्या चिमण्यांच्या घोळक्यावर पडतो. चिमण्या उडतात व त्यांचे पंख कापले जातात. त्यामुळे अनेक चिमण्या मृत्युमुखी पडत आहेत. - चेतन राजपूत, पक्षीप्रेमी
----------
कबुतरांना उडविणे बंद केले
माझ्या घरी कबुतर पाळले आहेत. सकाळी- सायंकाळी त्या कबुतरांना मुक्त विहारासाठी सोडतो. परंतु, हल्ली मोठ्या प्रमाणात बाहेर पतंग उडताना दिसतात. त्यात पतंगाचा मांजा हा धोकादायक असून, त्यामुळे पक्षी मरण्याची भीती निर्माण झाली आहे. - रमेश लिंगायत, पक्षीप्रेमी.
---------
तालुक्यात कोठेही नायलॉन मांजाची विक्री होणार नाही. असे आढळून आल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. नुकतीच तीन जणांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. तालुक्यात सगळीकडे पोलिसांचे मांजा विक्रीवर लक्ष आहे. अनुचित प्रकार आढळून आल्यास दंडात्मक कारवाई निश्चितच होईल.
- सम्राटसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक, वैजापूर
---------
फोटो