दारू दुकानांविरोधात पोलिसांचा अहवाल

By Admin | Updated: July 7, 2017 01:17 IST2017-07-07T01:10:30+5:302017-07-07T01:17:20+5:30

औरंगाबाद : नागरी वसाहतींमध्ये देशी-विदेशी मद्यांसह परमिटरूम्स स्थलांतरित करण्यासाठी होत असलेल्या हालचालींना वेग आला आहे.

Police report against liquor shops | दारू दुकानांविरोधात पोलिसांचा अहवाल

दारू दुकानांविरोधात पोलिसांचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नागरी वसाहतींमध्ये देशी-विदेशी मद्यांसह परमिटरूम्स स्थलांतरित करण्यासाठी होत असलेल्या हालचालींना वेग आला असून, नागरिकांनी त्या विरोधात लोकशाही मार्गाने हत्यार उपसले आहे. उल्कानगरी परिसरातील रेल्वेस्टेशन येथील देशी दारूचे दुकान (लायसन्स क्रमांक २१/२०१६-१७) स्थलांतरित होण्याबाबत जवाहरनगर पोलिसांनीदेखील परवाना दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे मत गोपनीय अहवालात नमूद आहे.
लोकमतने ६ जूनच्या अंकामध्ये ‘आता नागरी वसाहतींमध्ये चिअर्स’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून एन-२, उल्कानगरी आणि जयभवानीनगर येथील प्रकरणे उघडकीस आणली. या वृत्ताची दखल जवाहरनगर पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाने लायसन्स स्थलांतर मागणीचा प्रस्ताव चौकशीविना मंजूर न करण्याचा निर्णय घेतला आहे. मालखरे क्लासिक, शिवनेरीनगर, उल्कानगरी, गारखेडा परिसर येथील दुकान स्थलांतरित करण्यासाठी परवानगी देण्यास जवाहरनगर पोलिसांनी विरोध केला आहे. त्यामुळे त्या इमारतीत देशी दारूचे दुकान येणे सध्या तरी शक्य दिसत नाही. नागरिकांनी दाखविलेल्या एकजुटीचा आणि लोकमतने त्याला वाचा फोडल्यामुळे हे शक्य झाल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
सदरील देशी दारू दुकानास नागरिकांचा विरोध असून नगरसेविका जयश्री कुलकर्णी, दिलीप थोरात, अर्चना नीळकंठ यांनीदेखील याबाबत विरोध दर्शविला आहे. उच्चभू्र वसाहत आणि धार्मिकस्थळ असल्यामुळे तणावसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी गोपनीय अहवालात नमूद केले आहे. कामगार चौक ते जयभवानीनगरमार्गे पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर ते सूतगिरणी हा पूर्ण रस्ता ‘लिकर रोड’ म्हणून पुढे येतो आहे. नागरी वसाहतींमधून जाणाऱ्या रस्त्यांवर मद्य विक्रीची दुकाने स्थलांतरित होऊ नयेत, यासाठी नागरिक एकवटले आहेत.

Web Title: Police report against liquor shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.