पीडित महिलांना पोलिसांचे संरक्षण
By Admin | Updated: July 11, 2016 01:13 IST2016-07-11T01:05:07+5:302016-07-11T01:13:43+5:30
औरंगाबाद : पीडित महिलांना धमकावण्याचे अथवा आमिष दाखवून फिर्याद मागे घेण्यासाठी अथवा साक्ष बदलण्यासाठी दबाव येण्याची शक्यता असते.

पीडित महिलांना पोलिसांचे संरक्षण
औरंगाबाद : बलात्कार, विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून पीडित महिलांना धमकावण्याचे अथवा आमिष दाखवून फिर्याद मागे घेण्यासाठी अथवा साक्ष बदलण्यासाठी दबाव येण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पीडितांची महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी हे वारंवार भेट घेऊन आरोपींकडून काही त्रास असल्यास बिनधास्तपणे सांगा, त्यांना घाबरू नका, तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची, अशी ग्वाही देत आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन व्हावे, यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गतवर्षी पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या १५ पोलीस ठाण्यांतर्गत विनयभंगाचे एकूण ३८३ गुन्हे दाखल झाले होते, तर बलात्काराच्या ६५ घटना घडल्या होत्या. यातील अटक झालेल्या काही आरोपींना न्यायालयाने जामिनावर सोडलेले असते, अशा गुन्हेगारांकडून तक्रारदार महिलांना केस मागे घेण्यासाठी अथवा त्यांच्याविरोधात साक्ष देऊ नये, यासाठी धमकावण्याचे अथवा आमिष दाखवण्याचे प्रकार होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन अशा प्रकरणातील सर्व तक्रारदार महिलांची भेट घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी महिला अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सर्व तक्रारदार महिलांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. यातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन प्रकरणांतील आरोपींनी पीडितांना धमकावल्याचे उघड झाले. त्यामुळे त्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली. तसेच अन्य महिला अत्याचारांच्या गुन्ह्यातील प्रकरणातील पीडितांनाही सुरक्षेची हमी देण्यात आली आहे. १३४ निर्जन स्थळांवर वाढवली गस्त गतवर्षी सुंदरवाडी शिवारात आणि गोलवाडी परिसरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर टोळक्याने सामूहिक बलात्कार केल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे खडबडून जागे झालेल्या पोलीस यंत्रणेने प्रेमीयुगुलांचे अड्डे असलेली १३४ निर्जन स्थळे शोधून काढली आहेत. या स्थळी जोडप्यांना थांबू दिले जात नाही. शिवाय चार्ली पोलीस, पीसीआर मोबाईलवरील कर्मचाऱ्यांना नियमितपणे त्या स्थळाकडे जाण्याचे आदेशित केलेलेआहे.