पालिकेत पोलीस दिवसभर ताटकळत
By Admin | Updated: May 15, 2017 23:43 IST2017-05-15T23:37:17+5:302017-05-15T23:43:01+5:30
बीड : येथील पालिकेमध्ये क्षीरसागर काका - पुतण्यातील राजकीय द्वंद्व कायम असून, सोमवारी काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा दिल्याने पोलीस मांडून होते.

पालिकेत पोलीस दिवसभर ताटकळत
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील पालिकेमध्ये क्षीरसागर काका - पुतण्यातील राजकीय द्वंद्व कायम असून, सोमवारी काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा दिल्याने पोलीस दिवसभर ठाण मांडून होते. मात्र, आंदोलनकर्ते आलेच नाहीत.
स्वच्छता विभाग उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्याकडे असून, शहराच्या स्वच्छतेसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. ३१ मार्च आधीच आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या स्वाक्षरी अभावी कार्यारंभ आदेश निघाले नाहीत. त्यामुळे शहरातील स्वच्छतेची कामे रखडल्याचा आरोप करून काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाची तारीख व वेळ निवेदनात नमूद नव्हती. मात्र, सोमवारी सकाळपासून पालिकेसमोर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे सायंकाळी पाच वाजता पोलीस कर्मचारी परतले. त्यानंतर तेथे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर दाखल झाले. कोणत्याही क्षणी आंदोलन केले जाईल, असा इशारा देऊन आघाडीच्या नगरसेवकांनी प्रशासनाला संभ्रमात टाकले आहे.