पोलिस बदल्यांचा घोळच घोळ...!
By Admin | Updated: May 31, 2014 01:06 IST2014-05-31T01:05:12+5:302014-05-31T01:06:30+5:30
जालना : जिल्हा पोलिस यंत्रणेअंतर्गत वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्यांच्या बदल्यांचा घोळात घोळ सुरू

पोलिस बदल्यांचा घोळच घोळ...!
जालना : जिल्हा पोलिस यंत्रणेअंतर्गत वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्यांच्या बदल्यांचा घोळात घोळ सुरू असून, आतापर्यंत दोन वेळा निघालेले बदली आदेश रद्द झाल्याने बदल्यांची तिसरी यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. सोयीच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचार्यांच्या बदल्यांना पंधरा दिवस उलटूनही अंमलबजावणी झालेली नाही. आतापर्यंत या बदल्यांमध्ये दोन वेळा फेरबदल केले असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली असून, बहुतांश पोलिसांनी प्रशासनावर दबावतंत्राचा वापर केल्यामुळेच बदल्यांचा घोळ सुरू असल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी जिल्ह्यातील ४६५ पोलिस कर्मचार्यांच्या बदल्या केल्या होत्या. सुटीवर जाण्यापूर्वी हे आदेश त्यांनी जारी केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली होती. निकष ठरवून नियमानुसार या बदल्या करण्यात आल्या. मात्र दरम्यानच्या काळात सिंह सुटीवर गेल्याने बदल्यांचा गोंधळ सुरू झाला. आतापर्यंत दोनवेळा बदल्यांची यादी बदलण्यात आली. आता तिसर्या यादीची प्रतीक्षा लागली आहे. मुरब्बी पोलिस कर्मचार्यांची बदली टाळण्यासाठी अधिकार्यांशी ‘अर्थपूर्ण’ चर्चा केल्याची कुजबूज सुरू झाली आहे. त्यामुळे सोयीची यादी तयार होण्यावर कोणाचेही एकमत होत नसल्याने बदली प्रक्रीया अजूनही रखडल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्हा पोलिस यंत्रणेअंतर्गत या खेळामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेले अनेक पोलिस कर्मचारी त्रस्त झाले आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीच बदल्या झाल्या तर पाल्यांना सोयीच्या शाळेत प्रवेश दिला जाऊ शकतो. मात्र गोंधळ अजूनही कायम असल्याने मोठी अडचण झाली आहे. अनेक कर्मचार्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन्हीही याद्यांमधून संबंधित कर्मचार्यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. पंधरा दिवसातही काहीच ठोस कारवाई होऊ शकली नाही. ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचार्यांनी सुरू केलेल्या खेळामुळेच हे प्रकार होत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, संपूर्ण जिल्ह्यात पोलिस दलातील या खेळामुळे मोठी गोंधळावस्था उभी राहिली आहे. या जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आ वासून उभा राहिला असून, जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या गैरहजेरीतील हे प्रकार धक्कादायक आहेत. त्यामुळेच पेच प्रसंग उभे राहिले आहेत. (प्रतिनिधी)पोलिस अधीक्षकांनी बदलीचे आदेश २१ मे २०१४ रोजी काढले होते. या आदेशाची अंमलबजावणी करतांना उपअधीक्षक (गृह) वसावे यांनी बदलीची यादी जाहीर केली. मात्र ही यादी तब्बल आठ दिवसांनी मागे घेण्यात आली. पुन्हा २९ मे २०१४ रोजी दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली. लागोलाग ही यादीही रद्द झाली असून आता तिसरी यादी जाहीर होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.