तत्कालीन पोलीस निरीक्षकासह सावकाराविरूध्द गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 29, 2016 23:59 IST2016-12-29T23:05:33+5:302016-12-29T23:59:40+5:30
वाशी : पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्यासह सावकाराविरूध्द न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन पोलीस निरीक्षकासह सावकाराविरूध्द गुन्हा दाखल
वाशी : तालुक्यातील पारडी येथील सावकार लक्ष्मण घोडके यांना सावकारीच्या गुन्ह्यात मदत करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वाशी येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्यासह सावकाराविरूध्द न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, मृत महादेव वसंत सांडसे यांनी लक्ष्मण तुकाराम घोडके यांच्याकडून १० वर्षांपूर्वी ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या रकमेच्या व्याजापोटी सांडसे यांनी घोडके यांना १३ ते १४ लाख रुपये देऊनही घोडके यांच्याकडून अवाजवी पैशांची मागणी होत होती. यास कंटाळून महादेव सांडसे यांनी ४ आॅक्टोबर २०१५ रोजी गोलेगाव शिवारात आत्महत्या केली. पोलीस पंचनाम्यात मृताच्या खिशात दोन चिठ्ठ्या आढळल्या असून, यातील पोनि वाशी यांच्या नावे असलेल्या एका चिठ्ठीत सावकाराच्या व्यावहारिक माहितीचा तपशील होता. घटनेच्या २० दिवसांनंतर महादेव सांडसे यांच्या पत्नी मनिषा सांडसे यांनी ठोंबरे यांच्याकडे विचारणा केली असता ठंबरे यांनी हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठविल्याचे सांगितले. तत्कालीन पोनि साईनाथ ठोंबरे यांनी पदाचा गैरवापर करून महादेव सांडसे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लक्ष्मण घोडके याच्यावर कारवाई केली नाही. मृताच्या खिशातील चिठ्ठ्या तपासणी तज्ज्ञाकडे न पाठवता पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद न्यायदंडाधिकाऱ्यांकडे २० डिसेंबर २०१६ रोजी दाखल करण्यात आली होती. यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून २८ डिसेंबर २०१६ रोजी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)