महसूल व आरटीओने पकडलेली वाहने ठरतायेत पोलिसांची डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 23:19 IST2019-05-18T23:19:37+5:302019-05-18T23:19:49+5:30
पोलीस ठाण्याच्या आवारातून वाहने गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ही वाहने वाळूज व वाळूज एमआयडीसी पोलिसांसाठी मोठी डोकेदुुखी ठरत आहेत.

महसूल व आरटीओने पकडलेली वाहने ठरतायेत पोलिसांची डोकेदुखी
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात आरटीओ व महसूल विभागाने केलेल्या कारवाईत पकडलेली वाहने संबंधित अधिकाऱ्याकडून स्थानिक पोलीस ठाण्यात उभी केली जात आहेत. पोलीस ठाण्याच्या आवारातून वाहने गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ही वाहने वाळूज व वाळूज एमआयडीसी पोलिसांसाठी मोठी डोकेदुुखी ठरत आहेत.
आरटीओने धोकादायक तसेच कागदपत्रे नसलेली, कर न भरलेली व क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई सुरु केली आहे. कारवाई केलेल्या वाहनांसाठी आरटीओची साजापूर शिवारात स्वतंत्र जागा आहे. मात्र तरीही आरटीओ अधिकाºयाकडून कारवाईत पकडलेल्या वाहनावर विविध कलमांखाली दंडात्मक कारवाई करुन ती वाहने संबंधित पोलीस ठाण्याच्या आवारात उभी केली जात आहेत.
विशेष म्हणजे या वाहनाची संबंधित पोलीस ठाण्यात नोंदही केली जात नाही. हीच परिस्थिती महसूल प्रशासन विभागाची आहे. या परिसरात अवैध वाळू व मुरुमाची चोरटी वाहतूक सुरु असल्याने महसूल विभागाकडून कायम अशा वाहनांवर कारवाई केली जाते. पथकाकडून काही अपवाद वगळता मुद्देमालासह जप्त केलेल्या वाहनावर कोणताही गुन्हा दाखल केला जात नाही. ही वाहने ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन करुन पथक मोकळे होते. काही दिवसांपूर्वी वाळूज पोलीस ठाण्याच्या आवारातून महसूल विभागाने पकडलेला हायवा गायब झाल्याचे प्रकार उघडकीस आले.
याविषयी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड म्हणाले की, आरटीओ व महसूल विभागाने कारवाई केलेली वाहने त्यांच्या कार्यक्षेत्रात उभी करावी. गुन्हा दाखल करायचा असेल तर तशी माहिती द्यावी. पुढील कारवाई पोलीस करतील. ठाण्यात उभा असलेल्या या वाहनामुळे पोलिसांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.