... पोलिसांना आंदोलनाच्या वेळी करावी लागते कसरत
By Admin | Updated: November 25, 2015 23:16 IST2015-11-25T23:02:44+5:302015-11-25T23:16:52+5:30
जालना: जिल्हा कचेरीवर धडकलेल्या संतप्त मोर्चेकऱ्यांना सामोरे जाताना पोलिस प्रशासनाच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

... पोलिसांना आंदोलनाच्या वेळी करावी लागते कसरत
जालना: जिल्हा कचेरीवर धडकलेल्या संतप्त मोर्चेकऱ्यांना सामोरे जाताना पोलिस प्रशासनाच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मोर्चेकऱ्यांना कार्यालयाबाहेरच रोखून ठेवण्यासाठी प्रवेशद्वाराचे गेट बंद करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच अनेक वेळा गेट लागत नसल्याने आत घुसू पाहणाऱ्या मोर्चेकऱ्यांना बाहेरच रोखून ठेवण्यासाठी प्रसंगी बळाचाही वापर करावा लागत आहे. यातून तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध सामाजिक, राजकीय संघटनांचे मोर्चे, धरणे, निदर्शने आदी आंदोलन होतात. या आंदोलनातसहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या उद्रेकाचा सामनाही बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. अशावेळी आंदोलनकर्ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करतात. त्यांना बाहेरच रोखून ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात येते. मात्र देखभाल दुरूस्तीअभावी या प्रवेशद्वाराची आता दुरवस्था झालेली आहे. हे प्रवेशद्वार बंद करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. मंगळवारी आंबेडकरी समाज बांधवांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला होता. या मोर्चाला पोलिस प्रशासनाच्या अंदाजापेक्षाही मोठ्या प्रमाणात आंदोलकर्ते सहभागी झाले होते. मोर्चा येणार म्हणून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी गेट बंद करण्याचा प्रयत्न करूनही गेट बंद झालेच नाही. त्यामुळे मोर्चेकरांना गेटवरच रोखून ठेवण्यासाठीही मोठी कसरत करावी लागली.जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रवेशद्वाराच्या गेटची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. वेळीच दुरूस्ती न केल्यास एखाद्या आंदोलनातील आंदोलकर्त्यांचा उद्रेक झाल्यास पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तणाव होऊ शकतो. (प्रतिनिधी)