लहान बाबींवरही पोलिसांची नजर

By Admin | Updated: August 31, 2014 00:32 IST2014-08-31T00:32:35+5:302014-08-31T00:32:35+5:30

बीड : कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Police eye on small issues | लहान बाबींवरही पोलिसांची नजर

लहान बाबींवरही पोलिसांची नजर


बीड : कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अगदी लहान- लहान बाबींवरही पोलीस कर्मचाऱ्यांची नजर असून संशय आल्यास त्याची तपासणी करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा आढावा घेऊन विभागीय पोलीस उपअधीक्षक व संबंधित ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या होत्या. सण महोत्सवावर घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवावे, असे रेड्डी यांनी संबंधितांना सांगितले आहे.
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी मागविण्यात आले आहेत. जवळपास दोन हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी शहर व गावामधील मुख्य भागावर नियुक्त करण्यात आले आहेत. कोणत्याही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याची बाब समोर आली तर ती तात्काळ नियंत्रण कक्षाला कळविण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित ठाण्याचे पोलीस माहिती देत आहेत.
पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गणेश उत्सव आचारसंहिता पुस्तिकेत गणेश मंडळाच्या अध्यक्षांसाठी विविध सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन केल्यास मंडळांना फार समस्यांचा सामना करावा लागणार नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.(प्रतिनिधी)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक उत्सवात ७५ डेसीबलहून अधिक आवाजाचे ध्वनीक्षेपक वाजविता येणार नसल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बहुधा ही बाब अनेक गणेश मंडळांच्या अध्यक्षांना माहित नसावी. त्यामुळे जवळपास बीड शहरातील २५ हून अधिक गणेश मंडळांनी डी.जे. बुक करून त्यांना अ‍ॅडव्हान्स दिला आहे. मात्र संकुल क्षेत्र, व्यापारी क्षेत्रामध्ये डेसीबलच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास डी.जे. जप्त करण्यात येतील, अशा सूचना अप्पर पोलीस अधीक्षक माधव कारभारी यांनी दिल्या आहेत. त्यामुळे गणेश मंडळांना यंदा ढोल- ताशांवरच समाधान मानावे लागणार आहे. दरम्यान, गणेश विसर्जनाच्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नियम एका दिवसासाठी शिथील केल्यास डी.जे. वाजविण्यास मुभा मिळू शकते. मात्र याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही.

Web Title: Police eye on small issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.