पोलिस वसाहतीची दुरवस्था
By Admin | Updated: August 30, 2014 00:00 IST2014-08-29T23:42:14+5:302014-08-30T00:00:30+5:30
परभणी: येथील पोलिस वसाहतीमधील निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे.

पोलिस वसाहतीची दुरवस्था
परभणी: येथील पोलिस वसाहतीमधील निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. मागील काही वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यातील पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी येथे निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. परंतु मागील अनेक वर्षांपासून या वसाहतीची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने या दुरवस्थेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अनेक घरांची पडझड झाली असल्याने त्याची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या भागातील रस्त्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये वसाहतीत जाणे- येणे मोठे जिकरीचे काम होते. रस्त्यांवरील गिट्टी उखडून गेली आहे. पावसाळ्यात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना या रस्त्यावरुन येणे-जाणे करणे अवघड होत आहे. त्यामुळे या रस्त्यांचे नूतणीकरण करावे, अशी मागणीही पुढे येत आहे. निवासस्थानांच्या दुरवस्थेबरोबरच अनेक सोयी-सुविधाही उपलब्ध नाहीत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दूर अंतरावर जावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी वसाहतीमध्येच शाळा सुरू करावी. रात्रं दिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निवासस्थानांची दुरवस्था तर झालीच आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधनही तुटपुंजे आहे. या मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.
पोलिस वसाहतीतील समस्या व इतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांविषयी पोलिस अधीक्षकांकडे ऊहापोह करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी संतोष भालेराव, शरद टाकरस आदींनी केली आहे. नांदेड, लातूर या ठिकाणी नवीन इमारतींचे बांधकाम झाले आहे. त्याचसोबत रस्त्यांची कामे देखील झाली आहेत. परभणीतही नवीन इमारतींचे निर्माण करण्यात आले. परंतु रस्त्यांची कामे केली नाही. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे याप्रश्नी लक्ष घालावे आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)
या पोलिस वसाहतीमध्ये चारशे ते पाचशे कुटुंब राहतात. तसेच पोलिस अधिकाऱ्यांची ३० ते ३५ कुटुंब वास्तव्यास आहेत. परंतु थोडाही पाऊस आला तरी निवासस्थाने गळतात. या भागात मोठमोठ्या इमारती आहेत परंतु गार्डनची सोय नाही. रस्त्यांची देखील दुरवस्था झाली आहे. जागोजागी उखडलेले रस्ते, रस्त्यावर मोठमोेठे खड्डे पडलेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. परिणामी वाहने चालविणे अवघड झाले आहे.
या भागात कचराकुंडीची व्यवस्था नाही, घंटागाडी देखील येत नाही. परिणामी पोलिस कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांकडे लक्ष घालून ते सोडवावेत, अशी मागणी जय हो मित्रमंडळाच्या वतीने अमोल रणखांब, धनंजय रणखांब, पवन मस्के, सचिन जाधव, राहुल कातकडे, नितीन आगळे, शरद टाकरस, महेश जाधव, निखिल जाधव, पप्पू तारेख, संदीप मालसमिंदर, सय्यद मुनवर आदींनी केली आहे.