दुकाने फोडणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: January 10, 2017 23:42 IST2017-01-10T23:37:36+5:302017-01-10T23:42:01+5:30
किल्लारी : पोलिसांनी कॉम्प्युटर, मोबाईल चोरणाऱ्या तिघांच्या टोळीला मुद्देमालासह मंगळवारी सकाळी अटक केली आहे.

दुकाने फोडणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात
किल्लारी : औसा तालुक्यातील किल्लारी येथील बाजारपेठेतील दुकान फोडून संगणकाची चोरी करण्याचे प्रकार अलीकडे वाढले होते. या घटनेतील आरोपींचा शोध मात्र लागत नव्हता. अखेर किल्लारी पोलिसांनी कॉम्प्युटर, मोबाईल चोरणाऱ्या तिघांच्या टोळीला ६१ हजारांच्या मुद्देमालासह मंगळवारी सकाळी अटक केली आहे. या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किल्लारी येथे वर्षभरात वेगवेगळ्या भागातील दुकाने फोडून त्यातील कॉम्प्युटर, मोबाईल आणि इतर मौल्यवान साहित्य लंपास करण्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलही करण्यात आला. मात्र यातील आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होते.
चोरीतील संगणक विकण्यासाठी गुबाळ येथे यातील चोरटे येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत किल्लारी पोलिसांना मिळाली. दरम्यान, किल्लारी पाटी ते मंगरुळ रस्त्यावर महावितरण कार्यालय, कॅनल परिसरात हे चोरटे मोटारसायकलसह थांबले होते. अतुल विश्वनाथ क्षीरसागर (२०, रा. साठे नगर किल्लारी), मारोती माधव कांबळे (२८, रा. किल्लारी) या दोघा चोरट्यांना चोरीतील संगणकासह पोलिसांनी ताब्यात घेतले.
किल्लारी पोलिसांनी खाक्या दाखविताच आपल्या साथीदारांची नावे त्यांनी सांगितली.
याच टोळीतील तिसरा आरोपी समद इलाही शेख (२०, रा. शिवाजीनगर, निलंगा) याला राहत्या घरातून मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. (प्रतिनिधी)