घुसखोरांविरुद्ध पोलीस ‘अ‍ॅक्शन’

By Admin | Updated: September 13, 2014 00:35 IST2014-09-13T00:33:26+5:302014-09-13T00:35:27+5:30

औरंगाबाद : वसतिगृहांमध्ये अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसलेल्या घुसखोरांविरुद्ध पोलीस ‘अ‍ॅक्शन’चा फार्म्युला अवलंबिण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

Police action against infiltrators | घुसखोरांविरुद्ध पोलीस ‘अ‍ॅक्शन’

घुसखोरांविरुद्ध पोलीस ‘अ‍ॅक्शन’

औरंगाबाद : वसतिगृहांमध्ये अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसलेल्या घुसखोरांविरुद्ध पोलीस ‘अ‍ॅक्शन’चा फार्म्युला अवलंबिण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
शैक्षणिक कालावधी संपला तरी अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या काही वसतिगृहांवर कब्जा केलेला आहे. त्यामुळे नियमानुसार प्रवेश मिळालेले अनेक विद्यार्थी वसतिगृहापासून वंचित आहेत. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज शुक्रवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पुढाकार घेऊन सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका, वॉर्डन, विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक बोलावली होती; पण या बैठकीस काही विभागप्रमुख व प्राचार्य उपस्थित राहिले नाहीत.
या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, वसतिगृहात बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्यासाठी अगोदर ८ दिवसांच्या मुदतीची नोटीस दिली जाईल. त्यानंतरही त्यांनी वसतिगृह सोडले नाही, तर मग कुलसचिव, विभागप्रमुख, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिकांसमक्ष पोलिसांच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्याला वसतिगृहाबाहेर काढले जाईल. यासंदर्भात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले की, विभागप्रमुख व विद्यार्थी यांच्यामध्ये पाहिजे तसा सुसंवाद नाही. विभागप्रमुखांनीच विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. बेकायदेशीरपणे वसतिगृहे बळकाविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या कृतीस संबंधित विभागप्रमुख हेच जबाबदार आहेत. आपल्या विभागातील विद्यार्थ्यांचा प्रगती अहवाल संबंधित विभागप्रमुख व त्यांच्या प्राध्यापकांना माहिती असला पाहिजे. तो काय करतो, कुठे राहतो, त्याच्या संशोधनाचा कालावधी किती आहे. तो संपला असेल, तर त्याला कोणता सल्ला दिला, यासंबंधीची इत्थंभूत माहिती प्राध्यापकांना असावी; पण दुर्दैवाने ते होत नाही. यापुढे विभागप्रमुख व प्राध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Web Title: Police action against infiltrators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.