पोलिसांनी केली हिप्परग्यात कारवाई
By Admin | Updated: November 25, 2015 23:18 IST2015-11-25T23:12:39+5:302015-11-25T23:18:49+5:30
लोहारा : तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील अवैध दारुविक्री संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच लोहारा पोलिसांनी याची दखल घेत अवैध दारुविक्री करणाऱ्यांवर भापा टाकला.

पोलिसांनी केली हिप्परग्यात कारवाई
लोहारा : तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील अवैध दारुविक्री संदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच लोहारा पोलिसांनी याची दखल घेत अवैध दारुविक्री करणाऱ्यांवर भापा टाकला. यावेळी एकास अटक करून त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील महिलांनी अनेक महिने संघर्ष करून सन २००७ मध्ये गावात दारूबंदीचा ठराव पारित करून घेतला होता. परंतु, केवळ अडीच वर्षाच्या कालावधीतच दारूविक्रेत्यांनी महिलांच्या लढ्याला हरताळ फासत पुन्हा तेजीत अवैैध दारूविक्री सुरू केली. सद्यस्थितीत हिप्परगा (रवा) परिसरात दारूविक्रीला ऊत आला आहे. विशेषत: राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनाने अवैध दारूविक्री रोखण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील महिलांमधून होत आहे. याच अनुषंगाने ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात ‘दारुबंदीला हरताळ’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. लोहारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी या वृत्ताची दखल घेत तातडीने कारवाईचे आदेश दिले. यावरून बुधवारी सकाळी साडेदहा वाजता पोकॉ के. ए. सांगवे, एन. बी. वाघमारे, पी. एस. क्षीरसागर, एस. एन. शेवाळे यांनी हिप्परगा (रवा) येथील बसथांब्याजवळ अवैध दारुविक्री होत असलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी संभाजी लक्ष्मण मोरे यास अटक करुन त्याच्या ताब्यातून चारशे पन्नास रुपयाचा माल जप्त केला. तपास पोकॉ के. ए. सांगवे करीत आहेत. (वार्ताहर)