उघड्यावर शौचास जाणाऱ्या ९ जणांवर पोलीस कारवाई
By Admin | Updated: February 22, 2017 00:04 IST2017-02-22T00:00:48+5:302017-02-22T00:04:07+5:30
भोकरदन : भोकरदन शहरात उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या ७ जणांविरूध्द मंगळवारी पोलीस कारवाई करण्यात आली.

उघड्यावर शौचास जाणाऱ्या ९ जणांवर पोलीस कारवाई
भोकरदन : भोकरदन शहरात उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या ७ जणांविरूध्द मंगळवारी पोलीस कारवाई करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी ३०० रूपये दंड ठोठावला. नगर परिषद व पोलिसांनी राबविलेल्या या संयुक्त मोहिमेमुळे अनेकांनी लोटा सोडून पळ काढला.
भोकरदन नगरपरिषदेकडून शौचालय बांधकामासाठी जनजागृती सुरू आहे. गत आठवड्यापासून उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर पायबंद लागावा म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पदाधिकारीही पहाटे ५ ते ७ या वेळेत शौचालयास बसत असलेल्या ठिकाणी तळ ठोकून होते. दोन दिवस गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी करण्यात आली. त्यानंतर बेशरमाचे फुल दिले तरी सुध्दा याला आळा बसत नाही हे लक्षात आल्यावर मंगळवारी मुख्याधिकारी सचिंन वाघमारे यांनी भोकरदन पोलिसांची मदत घेतली. जे नागरिक उघड्यावर शौचालयास जातील त्यांच्याविरूध्द कार्यवाही करण्याची मोहीम उघडली. मंगळवारी सकाळी नवे भोकरदन, केळणा नदीचे पात्र, पोस्टआॅफीस परिसर, झोपडपट्टी परिसरामध्ये गुडमॉर्निंग पथकासह पोलिसांनी सकाळी उघड्यावर शौचास येणाऱ्या सात जणांना पकडून त्यांच्याविरूध्द भोकरदन पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अॅक्ट ११५/११७ उघड्यावर मलमूत्र विसर्जन केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या सात जणांना भोकरदन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने यांना प्रत्येकी ३०० रूपये दंड ठोठावला. दरम्यान दोन जणांनी पळ काढला.
नगरपरिषद गुडमॉर्निंग पथकामध्ये मुख्याधिकारी सचिंन वाघमारे, शामराव दांडगे, वामन आढे, राजू जाधव, प्रमोद प्रशाद, बबन जाधव, शेख सलीम, सिध्दार्थ गायकवाड, कैलास जाधव, परसराम ढोके, किरण बोर्डे, हिराबाई बिरारे, आशा पगारे, अनिता पगारे, अलका पगारे, साहेबखॉ, सुनीता पगारे, प्रणाबाई सावंत, सुनीता आढाव, मंडाबाई पगारे यांच्यासह पोलीस कर्मचारी शिंंदे, एस. के. आढावे, ए़ बी़ वाघ यांनी मंगळवारी सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना टमरेलसह पकडून पोलीस ठाण्यात आणले होते. बघ्याची यावेळी गर्दी झाली होती.
नगरविकास विभागाच्या सहाय्यक सचिंव सीमा झगडे यांनी आढावा बैठक घेऊन शौचालयांची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पालिका प्रशासन कामाला लागले आहे. सकाळी उघड्यावर शौचास येणाऱ्यांची धरपकड सुरू असल्याची चाहूल लागताच अनेकांनी लोटा सोडून पळ काढला़ (वार्ताहर)