मेसच्या मिष्टान्नातून १५ मुलींना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:12 IST2017-08-17T01:12:46+5:302017-08-17T01:12:46+5:30
मेसमधील जेवणामुळे या वसतिगृहातील १५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१५) सायंकाळी घडली.

मेसच्या मिष्टान्नातून १५ मुलींना विषबाधा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मेसमध्ये गोड जेवणाचा बेत डॉ. इं. भा. पा.महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी कटू अनुभव ठरला. मेसमधील जेवणामुळे या वसतिगृहातील १५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.१५) सायंकाळी घडली. त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून, सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी निराला बाजार येथील वसतिगृहात पुरी-भाजी व गुलाबजामूनचे जेवण होते. विद्यार्थिनींनी दुपारी जेवण केल्यानंतर सायंकाळी काही मुलींना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. वसतिगृह प्रशासनाने मुलींना समर्थनगर येथील खाजगी रुग्णालयात नेले. परंतु सुटी असल्यामुळे त्या दवाखान्याचा बाह्यरुग्ण विभाग बंद होता. त्यामुळे दुसºया खाजगी इस्पितळात ३० विद्यार्थिनींना नेण्यात आले.
डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यापैकी १५ विद्यार्थिनींना औषधी देऊन तात्काळ सुटी दिली. १५ विद्यार्थिनींना मात्र दवाखान्यात भरती करण्यात आले. डॉ. धनंजय खटावकर यांनी सांगितले की, मुलींना उलटी, जुलाब, डोकेदुखी, मळमळ असा त्रास होता. अन्नातून विषबाधा झाली असल्यामुळे या प्रकरणाची माहिती आम्ही पोलिसांना दिली. पोलिसांनी रात्री १०.३० वाजता येऊन मुलींना भेट दिली. महाविद्यालयानेदेखील पालकांना झालेल्या प्रकाराची माहिती कळविली. रात्रभर उपचार केल्यानंतर बुधवारी ८ मुलींना सुटी देण्यात आली. इतर ७ मुली अद्यापही दवाखान्यात उपचार घेत आहेत.