कवींनी मनाची दारे उघडी ठेवावी
By Admin | Updated: August 24, 2014 23:34 IST2014-08-24T23:34:32+5:302014-08-24T23:34:32+5:30
नांदेड : कविता समजून घेण्यासाठी सुक्ष्म संवेदनशिलता लागते असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी तथा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केले़

कवींनी मनाची दारे उघडी ठेवावी
नांदेड : नांदेडमध्ये असणारी रसिकता आणि साहित्य मुंबईत पहायला मिळत नाही़ कविता समजून घेण्यासाठी सुक्ष्म संवेदनशिलता लागते ती नांदेडच्या रसिक, कवींमध्ये आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी तथा मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी केले़ महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक श्रद्धा बेलसरे खारकर यांच्या ‘फाईल आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील तर ज्येष्ठ समीक्षक डॉ़ सुहास जेवळीकर, निर्मल प्रकाशनचे संचालक निर्मलकुमार सूर्यवंशी, श्रद्धा बेलसरे यांची मंचावर उपस्थिती होती़ प्रारंभी कवितासंग्रहाचे प्रकाशन डहाके यांच्या हस्ते करण्यात आले़ डहाके म्हणाले, कविंनी नेहमी मनाची दारं उघडी ठेवली पाहिजे़ शासकीय कामात आयुष्य घालवणाऱ्या श्रद्धा बेलसरे यांनी मनाची दारं उघडी ठेवून कार्य करीत राहिल्यामुळेच त्या कवयित्री होवू शकल्या़ मानवी भावबंद आणि संवेदनशिलता यामुळेच त्यांच्या कविता प्रेमवृत्ती व्यक्त करणाऱ्या आहेत़ आयुष्यात कधी प्रेम-प्रेमभाव कमी होत नसतो तर ते व्यक्त करणाच्या पद्धती बदलत असतात असे सांगत डहाके म्हणाले प्रेम हा एक मानवी अनुभव आहे़ ताटातुट, मानवी दुरावा आदी गोष्टी विघातक असून त्या कविला नको आहेत, हे श्रद्धा बेलसरे यांच्या कवितांतून स्पष्ट जाणवते़ ज्येष्ठ समीक्षक डॉ़ सुहास जेवळीकर म्हणाले, आज माहिती आणि ज्ञानाची गल्लत होत आहे़ माहिती आणि अनुभवाच्या सांगडीतून ज्ञानाचे लोणी तयार होते, हे लक्षात घेतले पाहिजे़ सृजलनशिलता, कल्पकतेकडे आपण लक्ष देत नाही़ माणूस आणि निसर्गाला आपण वेगळे संबोधत आहोत त्यामुळे माणसामध्ये अहंकार निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले़ बेलसरे यांच्या कविता सामाजिक भान असलेल्या आणि आत्मभान ठेवून लिहिलेल्या आहेत़ त्यामध्ये कुठेही आक्रमकता दिसत नसल्याचेही त्यांनी सांगितले़ समारोपात माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील म्हणाल्या, आठवीत असतांना केलेल्या कवितांची वही रद्दीमध्ये हरवली़ माझी कविता माझ्या घरच्यांनीच संपवल्या, अशा शब्दात खंत व्यक्त करीत ४२ वर्षापासून कवितेचे आणि आपले नाते तुटले़ परंतु, साहित्यिक, लेखक आणि कवी यांच्यापासून माझी कधीच सुटका झाली नाही़ त्यांचा सहवास मला नेहमीच लाभत राहिला, त्यामुळे मला त्यांच्याशी असलेले भावबंद कधीच संपवता आले नाही, असेही त्यांनी सांगितले़ श्रद्धा बेलसरे, आशा पैठणे आणि त्यांच्या मैत्रीविषयी बोलतांना त्यांनी उपस्थितांना भाऊक केलं़ प्रास्ताविक निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केले़ आशा पैठणे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)