तिच्या स्पर्शाने म्हातारा तरूण झाला, काठाने का होईना, समुद्र फिरून आला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:49 IST2017-10-06T00:49:02+5:302017-10-06T00:49:02+5:30
तिच्या स्पर्शाने म्हातारा तरूण झाला, काठा काठाने समुद्र फिरुन आला, अशा एकापेक्षा एक सरस कविता सादर करुन फ. मुं. शिंदे यांनी रसिक श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला.

तिच्या स्पर्शाने म्हातारा तरूण झाला, काठाने का होईना, समुद्र फिरून आला!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तिच्या स्पर्शाने म्हातारा तरूण झाला, काठा काठाने समुद्र फिरुन आला, अशा एकापेक्षा एक सरस कविता सादर करुन फ. मुं. शिंदे यांनी रसिक श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. ‘ती’ म्हणजे सत्तासुंदरी, ती म्हणजे लोकशाही, अशी एक ना अनेक ‘ती’ ची रुपे उलगडून दाखवत फ.मुं.नी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
जालना शहरातील सरस्वती भुवन प्रशालेच्या प्रांगणात ऊर्मी जालनाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘दुधात चांदणे सांडले’ या काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात डॉ. उल्हास उढाण आणि राज्याचे माजी सहकार आयुक्त डॉ. सुभाष माने यांना ‘ऊर्मी’चा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वीच वरुणराजाने हजेरी लावल्याने संमेलन वर्गखोलीत पार पडले. संमेलनात प्रा. ज्योती स्वामी, प्रा. शशिकांत पाटील, शिवाजीराव कायंदे, इंद्रजित घुले, वनमाला पाटील यांनी सहभाग नोंदवला.
फ.मुं. शिंदेंची ‘आपले मत मांडण्याची सोय राहिली नाही, जिव्हासोबत भांडण्याची सोय राहिली नाही. कसे कसे कोणी कोणी नित्य किती सैरभैर, दु:खात अश्रू सांडण्याची सोय राहिली नाही’ ही कविता उपस्थितांची दाद मिळवून गेली.
प्रा. ज्योती स्वामी यांनी स्त्री मनाचा ठाव घेणारी ‘मी शोध घेते बाई मनाचा’ ही कविता सादर केली. प्रा. शशिकांत पाटील यांनी आपल्या कवितेतून शेतकरी आत्महत्येवर आसूड ओढले. तर शिवाजीराव कायंदे यांनी सद्यस्थितीतील शेती आणि शेतकरी जीवनावर कविता सादर केली. इंद्रजित घुले यांनी प्रेमावर कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. वनमाला पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे गाणारी कविता सादर केली. संमेलनाचे नेटके सूत्रसंचालन कविवर्य जयराम खेडेकर यांनी केले. संमेलनाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी डॉ. राजन उढाण, डॉ. उल्हास उढाण, डॉ. प्रमोद डोईफोडे, प्रा. रंगनाथ खेडेकर, भाऊसाहेब घुगे, बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले, प्रा. नारायण बोराडे, शिवकुमार सोळुंके, अॅड. दीपक कोल्हे यांच्यासह रसिक श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.