कविता म्हणजे कवीची विवेकी जीवनदृष्टी
By Admin | Updated: September 8, 2014 00:33 IST2014-09-08T00:27:52+5:302014-09-08T00:33:08+5:30
औरंगाबाद : कविता केवळ शब्दांचा खेळ वा ओळींची उतरंड नसून, ती कवीची विवेकी जीवनदृष्टी असते.

कविता म्हणजे कवीची विवेकी जीवनदृष्टी
औरंगाबाद : कविता केवळ शब्दांचा खेळ वा ओळींची उतरंड नसून, ती कवीची विवेकी जीवनदृष्टी असते. काव्यलेखनासारखे जबाबदारीचे, मौलिक कृत्य करताना कवी संतत्वाकडे प्रवास करू लागतो. कवी कविता लिहीत राहील तोवर समाजातील विषमता व विसंगतींनाही टोकदार उत्तर मिळत राहील, अशी भावना कवी, कादंबरीकार रमेश इंगळे- उत्रादकर यांनी रविवारी व्यक्त
केली.
प्रतिभावंत साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या स्मृतिदिनी आयोजित बी. रघुनाथ स्मृतिसंध्येत इंगळे बोलत होते. नाथ ग्रुप, परिवर्तन व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित या सोहळ्यात रमेश इंगळे यांना लेखक संजय भास्कर जोशी यांच्या हस्ते बी. रघुनाथ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सतीश कागलीवाल, नंदकिशोर कागलीवाल, डॉ. भालचंद्र कांगो, प्रा. डॉ. मोहन फुले, अजित दळवी, श्रीकांत उमरीकर, सीताराम अग्रवाल, हनुमानप्रसाद बगडिया व शिव फाळके उपस्थित होते.
इंगळे म्हणाले की, कवितेतून कवी आपला आतला आवाज शब्दांत गोठवत असतो. केवळ जातिवंत वाचकच हा आवाज ऐकू शकतो. कवितेला सोबत घेऊनच कवी जगतो. व्यवस्थेशी होणारा संघर्ष हा कवीच्या जगण्याचाच भाग असतो. यातून त्याच्यासह त्याची कविताही समृद्ध होते.
मात्र, कविता निर्वात पोकळीत निर्माण होत नसून तिला काही एक सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अधिष्ठान लागते, असेही ते म्हणाले. मनोगताच्या शेवटी त्यांनी वाचलेल्या ‘हे माझे आई’ व ‘यत्किंचित दु:खाचे कारण’ या दोन कवितांना रसिकांची उत्कट दाद मिळाली.
नात्यातील हरवत जाणारी ओल, आटणारा संवाद याचा वेध घेते. महेश अचिंतलवार यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला साहित्यक्षेत्रातील मान्यवर व रसिक उपस्थित होते.