मर्मज्ञ रसिकराजाच्या जीवनप्रवासाचा गौरव
By Admin | Updated: September 19, 2014 00:06 IST2014-09-18T23:43:25+5:302014-09-19T00:06:44+5:30
परभणी : मराठवाड्याचे दामूअण्णा दाते अशा शब्दांत गौरवण्यात येणाऱ्या रसिकराज अॅड.वसंतराव पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनी त्यांच्या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन व संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.

मर्मज्ञ रसिकराजाच्या जीवनप्रवासाचा गौरव
परभणी : मराठवाड्याचे दामूअण्णा दाते अशा शब्दांत गौरवण्यात येणाऱ्या रसिकराज अॅड.वसंतराव पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनी त्यांच्या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन व संगीत समारोहाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात संमिश्र भावना दाटल्या होत्या. मराठवाड्यातून वसंतरावांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी कुलगुरू डॉ.सी.डी. मायी, कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत उषा पाटील कुर्डूकर यांनी संपादित केलेल्या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अॅड.मायी यांनी अॅड.पाटलांच्या रसिकतेचे दाखले देत त्यांचा गौरव केला. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी बोलताना गाण्यातील वादी-संवादीवर प्रेम करताना पाटलांनी जगण्यातला विसंवाद व संवाद समतोलपणे सांभाळीत परभणीच्या रुक्ष जीवनाला गायनी कळा दिली.
ज्ञानेश्वर- तुकारामांची जशी तुलना होत नाही तद्वतच वसंत पाटलांचीही कुणाशी तुलना करणे योग्य नाही. फार तर वसंतराव म्हणजे दैवी गुण असणारा आनंदयात्री एवढेच पुरेसे आहे, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा.रवीशंकर झिंगरे यांनी केले. जयश्री पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांच्या गायनाने झाली. (प्रतिनिधी)