पीएमडी : पोलिस तपासात ठोस कारवाई नाही
By Admin | Updated: July 21, 2014 00:27 IST2014-07-21T00:15:13+5:302014-07-21T00:27:15+5:30
पाथरी : पीएमडी कंपनीतून ग्राहकांची करोडो रुपयांची फसवणूक झाली़ या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला़ मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यानंतर १५ दिवस पोलिस कोठडी मिळाली़

पीएमडी : पोलिस तपासात ठोस कारवाई नाही
पाथरी : पीएमडी कंपनीतून ग्राहकांची करोडो रुपयांची फसवणूक झाली़ या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला़ मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यानंतर १५ दिवस पोलिस कोठडी मिळाली़ या काळात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मात्र विशेष काही हाती लागले नाही़ आठ गाड्या आणि किरकोळ मालमत्तेची कागदपत्रे जप्त करून पोलिसांनी तपास वेगळ्या दिशेने नेला़
पाथरी तालुक्यातील खेडुळा येथील मुंजाजी डुकरे याने स्थापन केलेल्या पीएमडी कंपनीमधून मागील दोन वर्षांत पाच हजारांपेक्षा अधिक ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली़ दामदुप्पट, तिप्पट आणि पाचपट रक्कमेच्या आमिषाला बळी पडलेल्या गुंतवणूकदारांनी कंपनीकडून पैसे येणे बंद झाल्यानंतर मुंजाजी डुकरे यांच्या पाठीमागे तगादा लावला़ करोडो रुपयांची माया घेऊन डुकरे आणि त्याचा साथीदार फरार झाला, तेव्हापासून गुंतवणूकदारांमध्ये मात्र हलचल सुरू झाली़ अनेक गुंतवणूकदारांनी प्रॉपर्टी विकून यामध्ये पैसे गुंतविल्याने सर्वच गुंतवणूकदार अडचणीत सापडले होते़
कंपनीचा मुख्य सूत्रधार मुंजाजी डुकरे आणि कृष्णा आबूज हे दोन आरोपी ५ जुलै रोजी पोलिसांना शरण आल्यानंतर करोडो रुपयांचा गैरव्यवहार असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे या प्रकरणाचा तपास सोपविला़
१५ दिवसांची पोलिस कोठडी मिळवूनही पोलिसांना या आरोपींकडून ठोस काही हाती लागले नाही़ पीएमडीमध्ये सहभागी असलेल्या काही एजंटांच्या गाड्या, एक ट्रक आणि मुंजाजी डुकरे याच्या नातलगाच्या सात ठिकाणच्या मालमत्तेची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली़ शेवटच्या टप्प्यामध्ये तपास रखडला गेला असल्याचे तपासावरून दिसून येत आहे़ (वार्ताहर)
गुंतवणूकदारांचे काय?
पीएमडी कंपनीमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या पैशाचे काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे़ पोलिस तपास करीत असताना पीएमडीच्या काही एजंटांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले़ त्यानंतर मात्र पुढील कारवाई ठप्प झाली़
काही बडे एजंट फरार
पीएमडी कंपनीमध्ये मुंजाजी डुकरे याच्यासोबत तेवढ्याच पद्धतीने सहभागी असलेले काही बडे एजंट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाले आहेत़ यामुळे अशा एजंटला पोलिसांचे अभय आहे की काय, अशी चर्चाही आता ऐकू येऊ लागली आहे़