PMC BANK : 'बँकेने पैसे बुडवले, सणासुदीच्या काळात काय करायचे'; पैसे मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 17:21 IST2019-09-24T17:14:49+5:302019-09-24T17:21:31+5:30
रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर निर्बंध लादल्याने ग्राहकांमध्ये खळबळ

PMC BANK : 'बँकेने पैसे बुडवले, सणासुदीच्या काळात काय करायचे'; पैसे मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप
औरंगाबाद : 'बँकेने पैसे बुडवले, सणासुदीच्या काळात काय करायचे'; पैसे मिळत नसल्याने ग्राहक हवालदिल झाले असून शाखेमध्ये मोठी गर्दी केली आहे. त्रुटी आढळून आल्याने रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. परिणामी, शहरातील या बँकेच्या दोन शाखेत मिळून सुमारे ८ हजार खातेदारांचे ७० ते ८० कोटी रुपये अडकले आहेत. पुढील सहा महिन्यात खात्यातून १ हजार रुपयेच काढता येणार असल्याने ग्राहकांमध्ये खळबळ माजली आहे.
रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध आणल्याचे सकाळी ९ वाजता खातेदारांच्या मोबाईलवर मेसेज पाठविले. टिव्ही चॅनलवरही बातम्या झळकल्या यामुळे शहरातील या बँकेच्या खातेदारांमध्ये एकच खळबळ उडाली. बँकेचे शहरात दोन शाखा असून त्यातील एक आकाशवाणी रोडवर व दुसरी उस्मानपुऱ्यात आहे. या दोनी शाखा उघडण्या आधीच खातेदारांनी गर्दी केली होती.
व्यवस्थापकांनी नोटीस चिटकवली
१० वाजता बँकेचे शटर उघडले त्यावेळीस व्यवस्थापकांनी एक नोटीस समोरील बाजूस चिटकविली. त्यावर लिहिण्यात आले होते की, बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमधील नियम ३५ ब अंतर्गत पुढील ६ महिने व्यवहारावर निर्बंध आणण्यात आले आहे. खातेदारांना सहा महिन्यात एकदाच त्यांच्या खात्यातून १ हजार रुपये काढता येणार आहे. ही नोटीस वाचून खातेदार बँकेत शिरत होते. काहींनी १ हजार रुपये काढण्यासाठी रांगा लावल्या होत्या. तर काहींजण व्यवस्थापकास घेरावा घातल त्यांच्यावर प्रश्नांचा भिडमार करीत होते.' बँकेन पैसे बुडवले, आमचे पैसे आधी द्या मग कारवाई करा, सणासुदीच्या दिवसात काय करायचे', अशा शब्दात आपल्याच खात्यातून आपलेच पैसे काढता येणार नसल्याने खातेदार संताप व्यक्त करत होते.
त्रुटी दूर करू
सुमारे १५० ते २०० खातेदारांनी आज पैसे काढले. अनेक खातेदारांनी पैसे काढले नाही. ६ महिन्याच्या आत व्यवहारातील त्रुटी दूर करु व पुन्हा बँक जोमात सुरु होईल, असे खातेदारांना सांगत आहोत.
- शंकर उसारे, शाखा व्यवस्थापक