आडत दुकानदारांकडून शेतकऱ्यांची लूट

By Admin | Updated: December 5, 2014 00:54 IST2014-12-05T00:20:21+5:302014-12-05T00:54:05+5:30

केज : सध्या तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत हाताला आलेले धान्य शेतकरी आडत दुकानदाराकडे विक्रीसाठी आणत आहेत.

The plunder of the shopkeepers looted | आडत दुकानदारांकडून शेतकऱ्यांची लूट

आडत दुकानदारांकडून शेतकऱ्यांची लूट


केज : सध्या तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत हाताला आलेले धान्य शेतकरी आडत दुकानदाराकडे विक्रीसाठी आणत आहेत. मात्र व्यापारी त्यांचा माल कमी भावात खरेदी करुन खरेदीची पक्की पावती देत नसल्याचा आरोप भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मोहन गुंड यांनी केला आहे.
केज येथील मोंढा भागात विक्रीसाठी शेतकरी माल आणतात. माल मोजताना एक ते दोन किलो धान्य काढून घेण्यात येते. शेतकऱ्यांकडून आडतही घेतली जाते. हमालीही घेतली जाते. याकडे मोंढ्यातील व्यापारी कानाडोळा करतात. दुकानावर धान्य दिल्यानंतर त्याची कमी भावात खरेदी करुन माल खरेदीची पक्की पावती दिली जात नाही, असा आरोप गुंड यांनी केला आहे.
हमी भावापेक्षा कमी भावाने माल खरेदी करू नये, दोन दिवसात मोंढ्यातील व्यवहारात सुधारणा झाली नाही तर बाजार समितीच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असेही गुंड यांनी म्हटले आहे. केज तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांची लूट होत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर शेतकरी हवालदिल होतील. त्यामुळे शेतकऱ्यांकडे आस्थापूर्वक पाहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांवर दरवर्षी अस्मानी संकट कोसळत आहे. पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. त्याला तोंड देत शेतकरी धान्य पिकवितो. मात्र ते विक्रीस आणले असता हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केला जाते. यामुळे त्यांचे मोठे नुकसान होते.
शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या दुकानांचा परवाना कायमचा रद्द करावा, अशी मागणी गुंड यांनी केली आहे.
शेकाप आंदोलनाच्या पावित्र्यात
जो व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा माल खरेदी करेल, त्याचा पंचनामा करुन त्याच्यावर कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांनी त्यांचा माल पक्क्या पावतीशिवाय देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बाजार समितीचे सभापती व सचिव यांनी पुढाकार घेऊन दुकानदारांना सूचना द्याव्यात, अन्यथा आंदोलन करू, असे अशोक रोडे, योगेश्वर अंबाड, श्रीराम तांदळे, हनुमंत मोरे, विनोद आगलावे, गजेंद्र देशमुख यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: The plunder of the shopkeepers looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.