औसा कृउबामध्ये भूखंड घोटाळा
By Admin | Updated: July 28, 2014 00:55 IST2014-07-27T23:53:13+5:302014-07-28T00:55:46+5:30
औसा : औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सचिवांनी पदाचा गैैरवापर करून आरक्षित भूखंड लाटल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला़

औसा कृउबामध्ये भूखंड घोटाळा
औसा : औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सचिवांनी पदाचा गैैरवापर करून आरक्षित भूखंड लाटल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला़ तीन प्लॉट आरक्षित असताना ते बेकायदेशीररित्या बळकाविले आहे़ बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सचिवांची पदावरून हाकालपट्टी करावी, अशी मागणीही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली़
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे, सचिव अण्णासाहेब चव्हाण, बालाजी गिरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर देशमाने यांनी कृषी बाजार समितीचे सचिव व पदाधिकाऱ्यांवर आरोप करून नातलगांच्या नावाने भूखंड बळकाविल्याचा आरोप केला़ बाजार समितीमध्ये बेकायदेशीर व नियमबाह्य नोकर भरती करण्यात आल्याचा आरोपही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आला आहे़
लातूरच्या उपनिबंधकांनी या तीन प्लॉटचे बेकायदेशीर वाटप रद्द करावे, असे आदेश बाजार समिती प्रशासनाला दिले होते़ पण बाजार समितीने ते आदेशही पाळले नसल्याचा आरोप मनसेने केला आहे़ बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सचिवांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अन्यथा बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला़(वार्ताहर)
मनसेच्या आरोपासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्याम कुलकर्णी यांना विचारणा केली असता ते म्हणाले, मी स्वत: अथवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांच्या नावे प्लॉट दिलेला नाही़ मागणी केलेल्यांना नियमाप्रमाणे प्लॉटचे वाटप करण्यात आले असून यात गैरव्यवहार होण्याचा प्रश्नच नाही, असे सांगितले़ सभापती योगीराज पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़