७८२ गावांत ग्रामसभांद्वारे स्वच्छतेची प्रतिज्ञा
By Admin | Updated: September 30, 2014 01:25 IST2014-09-30T00:00:55+5:302014-09-30T01:25:14+5:30
जालना : महात्मा गांधी जयंती दिनी निर्मल भारत अभियानांतर्गत गाव पातळीवर विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गावात स्वच्छता टिकवून ठेवणे

७८२ गावांत ग्रामसभांद्वारे स्वच्छतेची प्रतिज्ञा
जालना : महात्मा गांधी जयंती दिनी निर्मल भारत अभियानांतर्गत गाव पातळीवर विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गावात स्वच्छता टिकवून ठेवणे व इतरांनाही स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी प्रवृत्त करण्याची प्रतिज्ञा जिल्हाभरातील ७८२ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थ घेणार आहेत.
ग्रामसभा ही लोकशाही व्यवस्थापनावरील सर्वोच्च यंत्रणा असल्याने या दिवशीची ग्रामसभा बंधनकारक करण्यात आली आहे. ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी गावनिहाय संपर्क अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ च्या पार्श्वभूमीवर मतदार साक्षरता व मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने आपले नाव यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व मतदारांना शंभर टक्के मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार असून केंद्र शासनाच्या नव्याने सुरू होणाऱ्या स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय स्वच्छता पंधरवाडा (२५ सप्टेंबर ते २३ आॅक्टोबर) प्रत्येक गावात घरोघरी वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करून शौचालयाच्या बांधकामाचे उदघाटन करण्यात येणार आहे.
शाळेतील मुले व गावकरी यांची सकाळी एकत्रित प्रभात फेरी काढून ग्रामसभेत सर्वांना गावातील स्वच्छता व घरातील स्वच्छता टिकवून ठेवणे व हागणदारीमुक्त करण्याची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था यामध्ये महिला व पुरूषांच्या आवश्यकतेनुसार स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
गावपातळीवर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करणे तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी संकलित करणे, गावातील शाळा व अंगणवाडीचा परिसर श्रमदानातून स्वच्छ करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत किमान एका कामाची सुरूवात करणे, सिंचनाच्या क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून गावात किमान ५ वनराई बंधारे उभारण्यात यावे, अशी प्रतिज्ञा ग्रामस्थ करणार आहेत. ग्रामस्थांनी स्वच्छताविषयक प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांनी केले आहे.