जोगेश्वरीत वृक्षारोपण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:06 IST2021-07-14T04:06:17+5:302021-07-14T04:06:17+5:30
वाळूज महानगर : जोगेश्वरी येथील जोगाईमाता मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सरपंच गजानन बोंबले, उपसरपंच ...

जोगेश्वरीत वृक्षारोपण कार्यक्रम
वाळूज महानगर : जोगेश्वरी येथील जोगाईमाता मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सरपंच गजानन बोंबले, उपसरपंच प्रवीण दुबिले, अमोल लोहकरे, ग्रामविकास अधिकारी बी. एल. भालेराव, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर काजळे, गणेश ठोकळ आदींच्या उपस्थितीत मंदिर परिसरात विविध जातींची झाडे लावण्यात आली. कार्यक्रमाला पंडित पनाड, विलास सौदागार, कृष्णा काजळे, मोईस शेख, योगेश दळवी, प्रकाश साबळे, प्रवीण थोरात, रामेश्वर आरगडे, अनिल वाघ, सुरेश वाघमारे, किशोर बिलवाल, नजीरखॉ पठाण आदींची उपस्थिती होती.
--------------------------
रांजणगावात एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला
वाळूज महानगर : अज्ञात चोरट्यांनी रविवारी (दि.११) पहाटे ४ वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथे एका बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मशीन न फुटल्याने रोकड लांबविण्याचा चोरट्याचे स्वप्न भंगले. रांजणगावातील देवगिरी कॉलनीत एफडीएफसी या बँकेचे एटीएम केंद्र आहे. रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास या एटीएम केंद्रात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र एटीएम मशीन फोडता न आल्याने या एटीएममधील रोकड वाचली आहे. हा प्रकार दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्यानंतर जकींद्र पव्हरे यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
----------------------
विटावा येथून चिमुकल्यासह महिला बेपत्ता
वाळूज महानगर : विटावा येथून एक २१ वर्षीय महिला अडीच वर्षाच्या चिमुकल्यासह बेपत्ता झाली आहे. आरती मुंजाराम रत्नपारखे (२१ रा. विटावा) ही महिला शनिवारी (दि.१०) अडीच वर्षाचा लहान मुलगा बालाजी यास सोबत घेऊन घरातून निघून गेली आहे. याप्रकरणी पती मुंजाराम रत्नपारखे यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
--------------------------
वाळूज महानगरात दोन दिवसांपासून पावसाची हजेरी
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. गत पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविली जात होती. वाळूज परिसरात रविवारी रात्री व सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.
--------------------------
वाळूजला आरोग्य केंद्रासमोर खड्डे
वाळूज महानगर : वाळूजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर व रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रुग्ण तसेच नातेवाईक यांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने ये-जा करणारे वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने किरकोळ स्वरूपाचे अपघातही घडत आहे.
------------------------------