पेट्रोल पंप उभारण्याची योजना जागेअभावी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:26+5:302021-02-05T04:16:26+5:30
महापालिकेचे स्वत:चे पेट्रोल पंप असतील तर उत्पनाच्या स्रोतांमध्ये भर पडेल, अशी कल्पना प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मांडली आणि त्या ...

पेट्रोल पंप उभारण्याची योजना जागेअभावी रखडली
महापालिकेचे स्वत:चे पेट्रोल पंप असतील तर उत्पनाच्या स्रोतांमध्ये भर पडेल, अशी कल्पना प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मांडली आणि त्या दृष्टीने काम सुरू करण्यात आले. ऑईल कंपनीच्या सहकार्याने पेट्रोल पंप उभारण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. पंप उभारण्यासाठीची जागा महापालिकेची, पंपावरील काही कर्मचारी महापालिकेचे. जागेचे भाडे ऑईल कंपनी महापालिकेला देणार, त्याशिवाय कंपनीच्या दराने महापालिकेच्या वाहनांना इंधनाचा पुरवठा केला जाणार. खासगी वाहनांना मात्र बाजारातील दराने इंधन पुरवठा करण्याचे महापालिकेने निश्चित केले. मध्यवर्ती जकात नाका, हर्सूल - सावंगी नाका, कांचनवाडी, दुग्धनगरी, गायमुखचा परिसर आणि गरवारे स्टेडियम या सहा ठिकाणी पेट्रोल पंपांसाठी जागा निश्चित करण्यात आली. त्यापैकी मध्यवर्ती जकात नाका येथील जागेवर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला पंप उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. मागील सहा महिन्यात विविध शासकीय कार्यालयांकडून मिळवावे लागणारे नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही. त्यामुळे जानेवारी महिना संपत आला तरी पेट्रोल पंप उभारण्याच्या प्रक्रियेला गती मिळालेली नाही.
पंप चालविण्याचा मनपाला अनुभव
काही वर्षांपूर्वी मध्यवर्ती जकात नाक्याच्या परिसरातच महापालिकेचा डिझेल पंप होता. अनेक वर्षे महापालिकेने हा सुरू ठेवला होता. महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मिळून हा पंप बंद पाडला. नवीन पंप सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रचंड अनास्था दाखविण्यात येत आहे.