गाव पाहणी न करताच बनताहेत आराखडे
By Admin | Updated: March 29, 2016 00:49 IST2016-03-29T00:19:34+5:302016-03-29T00:49:07+5:30
बीड : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये तालुकास्तरीय समितीने गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी चर्चा करून ते सांगतील

गाव पाहणी न करताच बनताहेत आराखडे
बीड : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये तालुकास्तरीय समितीने गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी चर्चा करून ते सांगतील त्याच कामांना प्राधान्य देणे बंधनकारक आहे; मात्र तालुकास्तरीय समिती जिल्ह्याच्या ठिकाणी बसूनच गावाच्या विकास आराखडे बनवीत असल्याने जलयुक्त योजनेच्या कामांना घरघर लागण्याची शक्यता जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
पूर्वी अधिकाऱ्यांना वाटतील तीच कामे गावांमध्ये राबविली जात होती. मात्र, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामाच्या या पद्धतीत बदल केला आहे. तालुकास्तरावर एक समिती नेमली आहे.
या समितीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये जाऊन एक दिवस मुक्काम करायचा, तेथील ग्रामस्थांशी चर्चा करायची, निवडलेल्या गावात कुठली कामे महत्त्वाची आहेत, असे ग्रामस्थांना वाटते, हे जाणून घ्यायचे व त्याप्रमाणे तेथील कामांचा कृती आराखडा बनवायचा, ही पद्धत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लागू केली आहे. मात्र, या नियमाला तिलांजली दिली जात आहे.
अधिकारी गावात मुक्काम न करता तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी बसूनच गावात कुठली कामे करायची, याचा आराखडा बनवीत असल्याने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना संबंधित गावासाठी किती उपयुक्त ठरतील, याबाबत शंका निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)