गणवेश वाटपाचे नियोजन बारगळणार
By Admin | Updated: June 8, 2017 23:51 IST2017-06-08T23:47:29+5:302017-06-08T23:51:06+5:30
हिंगोली :गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाकडून नियोजन बारगळणार आहे

गणवेश वाटपाचे नियोजन बारगळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शाळा उघडताच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाकडून दरवर्षी नियोजन केले जाते. मात्र निधी वेळेत उपलब्ध होत नसल्याने गणवेश वाटपाचे नियोजन दरवर्षी बारगळते. यावर्षीपासून सदर गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार होती. मात्र अद्याप विद्यार्थ्यांच्या ती जमा झाली नाही. सदर योजनेसाठी लागणारा निधीच शासनाकडून उपलब्ध झाला नसल्याचे सर्व शिक्षाने सांगितले.
जिल्हा परिषद व अनुदानित शाळेतील पात्र विद्यार्थी व सर्व विद्यार्थिनींना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश वाटप केले जातात. शिवाय येत्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शाळा उघडण्यास केवळ सहा दिवस उरले आहेत. परंतु निधीच उपलब्ध न झाल्याने बँक खात्यावर रक्कम जमा झाली नाही. शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर दोन गणवेशांची रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी पालकाचे व लाभधारक मुलाचे बँकेत जॉर्इंट खाते काढण्याची अट शासनाने घातली असून ती पूर्ण करणे बंधनकारक आहे. परंतु किती विद्यार्थ्यांचे बँक खाते अद्ययावत झाले आहे, याबाबत शिक्षण विभागाकडे माहिती उपलब्ध झालेली नाही. वेळेत गणवेश वाटपाचे संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना वारंवार कळविण्यात आले होते. शिवाय शिक्षणाधिकाऱ्यांनी सूचनाही दिल्या होत्या. परंतु निधीच उपलब्ध न झाल्याने ‘शाळा उघडताच विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश’ नियोजन बारगळणार असल्याचे दिसून येत आहे. एससी, एसटी व बीपीएलधारक विद्यार्थ्यांसाठी तर सर्व प्रवर्गातील मुलींसाठी शासनाकडून मोफत गणवेश वाटपाची योजना राबविली जाते.