विमान प्रवासही ‘हाऊसफुल’ं
By Admin | Updated: October 19, 2014 00:39 IST2014-10-19T00:34:48+5:302014-10-19T00:39:43+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता दिवाळीच्या सुट्यांनिमित्त गावी आणि पर्यटनासाठी विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून नियोजन करण्यात आले आहे.

विमान प्रवासही ‘हाऊसफुल’ं
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर आता दिवाळीच्या सुट्यांनिमित्त गावी आणि पर्यटनासाठी विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून नियोजन करण्यात आले आहे. शिवाय अनेकांचा प्रवासही सुरू झाला आहे. यामुळे विविध रेल्वेगाड्या, बसगाड्यांबरोबर मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या विमानांची आगामी दिवसांमधील बुकिंग फुल झाली आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत गेल्या काही दिवसांत औरंगाबादहून बाहेर जाणाऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे वाहतूक सेवेला त्याचा फटका सहन करावा लागला; परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता दिवाळी सणाच्या सुट्यांमध्ये गावी जाण्याबरोबर लहान, मोठ्या ठिकाणी पर्यटनासाठी जाण्यासाठी नियोजन करण्याची लगबग सध्या सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून पर्यटनासाठी परिवारासोबत तसेच मित्रांबरोबर जाण्याचा कल दिसून येत आहे. सुट्यांमध्ये यंदा दक्षिण भारत, दिल्ली, अमृतसर, काश्मीर, वैष्णोदेवी, डेहराडून यासह अन्य ठिकाणी जाण्यास पसंती दिली जात आहे.
औरंगाबादहून मुंबई, दिल्लीपर्यंतचा प्रवास विमानाने करून त्यानंतर या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांकडून नियोजन करण्यात आले आहे. यामुळे औरंगाबादहून मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या विमानांची आगामी काही दिवसांतील बुकिंग फुल झाली आहे. त्यामुळे २३ आॅक्टोबरनंतर दिवाळीत पर्यटनासाठी शहरवासीय मोठ्या संख्येने विविध ठिकाणी पर्यटनाला जातील. दिवस, फ्लाईटची वेळ आणि आसनव्यवस्थेनुसार तिकिटांच्या दरात बदल होत असल्याने ऐनवेळी प्रवास करताना अधिक पैसे मोजण्याची वेळ अनेक प्रवाशांवर येणार आहे.