गरजूपर्यंत पोहोंचेनात योजना
By Admin | Updated: January 30, 2016 00:25 IST2016-01-30T00:17:25+5:302016-01-30T00:25:57+5:30
उस्मानाबाद : शासनाच्या वतीने विविध घटकांसाठी योजना जाहीर केल्या जातात. विशेषत: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने खास उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आखल्या आहेत.

गरजूपर्यंत पोहोंचेनात योजना
उस्मानाबाद : शासनाच्या वतीने विविध घटकांसाठी योजना जाहीर केल्या जातात. विशेषत: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने खास उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना आखल्या आहेत. मात्र प्रसार, प्रचाराचा अभाव तसेच प्रशासन आणि गाव पुढाऱ्यांची उदासिनता यामुळे या योजना गरजू लाभार्थ्यांपर्र्यंत प्रभावीपणे पोहंचत नसल्याचे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून शासनाने उस्मानाबाद जिल्ह्यासाठी खास योजना जाहीर केल्या आहेत. मात्र या योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहंचत नसल्याने शासनाच्या मूळ हेतूला नख लागत असल्याचे दिसून आले. शासकीय योजनांची माहिती आपणापर्यंत पोहंचते का? असा थेट सवाल लोकमतने सर्वेक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विचारला होता. यावर तब्बल ४६ टक्के शेतकऱ्यांनी योजनांची माहिती मिळत नसल्याचे सांगितले. ३३ टक्के शेतकरी कधी-कधी माहिती मिळते असा म्हणतात. तर २१ टक्के शेतकऱ्यांनी शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहंचत नाही असे स्पष्टपणे सांगितले. लोकमतने या सर्वेक्षणावेळी शेतकऱ्यांना आपण एखाद्या शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे का? असा प्रश्नही विचारला. यावर २८ टक्के शेतकऱ्यांच्या पदरी कोणत्या न कोणत्या योजनेचा लाभ पडला आहे. मात्र ५५ टक्के शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एकाही योजनेचा लाभ मिळालेला नसून २७ टक्के शेतकऱ्यांनी काही प्रमाणात शासकीय योजनेचा लाभ मिळाला असल्याचे सांगितले. शासन योजना जाहीर करतानाच संबंधित विभागाला विशिष्ट लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचे टार्गेट देते. मात्र या योजनेचा लाभ मिळालेला प्रत्येक शेतकरी गरजू असतोच असे नाही. अनेकवेळा एकाच शेतकऱ्याला अनेक योजनांचा लाभ मिळत असल्याचेही दिसून आले. त्यामुळेच की काय तब्बल ५९ टक्के शेतकऱ्यांनी गरजू शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचे सांगत, या योजनेचा लाभ तिसराच कोणी लाटत असल्याचे मत मांडले. ३३ टक्के शेतकऱ्यांनी मात्र गरजूंना योजनेचा लाभ मिळतो, असे सांगितले. तर ८ टक्के शेतकऱ्यांनी याबाबत काहीही सांगता येत नसल्याचे प्रश्नावलीमध्ये नमूद केले.