पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल
By Admin | Updated: April 19, 2015 00:47 IST2015-04-19T00:42:49+5:302015-04-19T00:47:51+5:30
जेवळी : लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील दोन डीपीचा वीज पुरवठा मागील पाच दिवसांपासून बंद पडल्याने गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून

पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल
जेवळी : लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील दोन डीपीचा वीज पुरवठा मागील पाच दिवसांपासून बंद पडल्याने गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे.
सात हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या आष्टाकासार या गावातील नागरिकांना मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. आठ दिवसांपासून या परिसरात वादळी वारे व हलका पाऊस पडत आहे. त्या दिवसांपासून या गावचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. या गावाला येणेगूर उपकेंद्रावरुन वीजपुरवठा होत आहे. ग्रामपंचायत कार्यालयाजवळील एक व दर्गाहजवळील एक अशा दोन डिपीचा वीज पुरवठा मागील पाच दिवसांपासून खंडित आहे. यासंदर्भात संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांना सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना याचा मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्वराज्य प्रकल्पाची विहीरही हंगरगा येथील साठवण तलावात आहे. तेथील थोडेफार पाणी गावातील ग्रामपंचायत जवळील एका विहिरीत आणून सोडले जाते. ते पाणी व अधिग्रहण बोअरवरील पाण्यावर गावाची तहान भागविली जात आहे. मात्र वीज मंडळाच्या हलगर्जी व मनमानी कारभारामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे उपसरपंच गंगाधर बलसुरे, गणेश शिदोरे, सुनिल सुलतानपुरे यांनी केली आहे. वीज मंडळाच्या कारभाराची तक्रार आ. ज्ञानराज चौगुले यांच्याकडेही करण्यात आली आहे. तरीही यासंदर्भात अजून कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रा.पं. सदस्य सुनील सुलतानपुरे यांनी सांगितले. (वार्ताहर)