गोळीबार प्रकरणातील पिस्तूल पडेगावात जप्त
By Admin | Updated: May 26, 2015 00:51 IST2015-05-26T00:35:54+5:302015-05-26T00:51:42+5:30
औरंगाबाद : महिला वकिलाला अडकवण्याच्या उद्देशाने अट्टल गुन्हेगारांकडून स्वत:वर गोळीबार करून घेणाऱ्या अॅड. नीलेश घाणेकर यांचा बनाव दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणला.

गोळीबार प्रकरणातील पिस्तूल पडेगावात जप्त
औरंगाबाद : महिला वकिलाला अडकवण्याच्या उद्देशाने अट्टल गुन्हेगारांकडून स्वत:वर गोळीबार करून घेणाऱ्या अॅड. नीलेश घाणेकर यांचा बनाव दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणला. घाणेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींनी वापरलेले आॅटोमॅटिक पिस्तूल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पडेगाव, कासंबरीनगर दर्गा परिसरातून सोमवारी जप्त केले.
याविषयी पोलिसांनी सांगितले की, बलात्काराची तक्रार पोलिसांत नोंदविणाऱ्या महिला वकिलाला धडा शिकविण्यासाठी ५ मे रोजी मध्यरात्री बीड बायपास रोडवरील गोदावरी टी पॉॅइंटजवळ आरोपींकडून घाणेकर यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या होत्या. पोलिसांनी घाणेकर यांच्यासह शेख मुजफ्फर ऊर्फ सोनू जहागीरदार, सय्यद मुजीब (३४, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) यांना अटक केली आहे. आरोपी राजू जहागीरदार आणि समीर पठाण हे अद्याप फरार आहे. मुजीब याने गोळीबार केला होता. घटनेनंतर तो पिस्तुलासह पळून दुचाकीवर पळून गेला होता. पोलीस चौकशीदरम्यान सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सोमवारी सकाळी पोलिसांनी त्याची पुन्हा चौकशी सुरू केली असता त्याने सहकार्य करीत कासंबरी दर्गा परिसरातील एका बाभळीच्या झाडाखाली खड्डा खोदून लाल रंगाच्या कपड्यात पिस्तूल पुरून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने ती जागाही दाखविली. पोलिसांनी त्या ठिकाणी उकरून पाहिले असता लाल रंगाच्या कपड्यात त्यांना पिस्तूल मिळाल्याचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले. सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, अयुब पठाण, दत्ता गडेकर, शेख जावेद यांनी पंचांसमक्ष हे पिस्तूल जप्त केले. पोलिसांनी आतापर्यंत आरोपींकडून एक टाटा सफारी कार, रिकाम्या दोन पुंगळ्या, एक मोटारसायकल जप्त केलेली आहे.
दरम्यान अटकेतील मुजफ्फर आणि मुजीब यांची पोलीस कोठडी एक दिवस वाढली आहे. घाणेकर यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.